
सामना प्रतिनिधी । अलिबाग
पीएनपी या खासगी कंपनीला वा पोर्टला कोणत्याही परिस्थितीत रेल्वे मार्गाची सायडिंग दिली जाणार नाही आणि कोणी असे करत असेल व अलिबाग प्रवासी सेवा थांबविण्याचा प्रयत्न करीत असाल तर हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा आरसीएफला अनंत गीते यांनी भाषणातून दिला आहे. याबाबत जर करार झाला असेल तर तो रद्द करा आणि हा करार दुर्दवाने झाला असेल तर त्याची चौकशी करून त्या गुन्हेगाराला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. अलिबागमध्ये रेल्वे आणायची आहे. याबाबत रेल्वे मंत्री पियुष गोयल व केमिकल फर्टिलायजर मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिल्याचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अलिबाग येथे शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आपल्या भाषणात त्यांनी सुनील तटकरे व आ. जयंत पाटील यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. गीते पुढे म्हणाले की, पीएनपी या खासगी कंपनीच्या प्रकल्प विस्तारामुळे पेण अलिबाग प्रवासी रेल्वेला रखडण्याचा विषय बातम्यांमध्ये वाचण्यात आला आहे. आरसीएफ ही केंद्र शासनाची सार्वजनिक उपक्रम कंपनी असून कोणत्याही खासगी कंपनीसाठी वा पोर्टसाठी स्थापन केलेला उपक्रम नाही. त्यामुळे आरसीएफने चुकीचे पाऊल टाकू नये, खासगी कंपनीचे लाड पुरविण्याची आवश्यकता नाही. तुम्ही कारवाई करायला भाग पाडू नका, असा इशारा व्यासपीठावरून देत असल्याचे गीते यांनी आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी गीते यांनी तटकरे यांच्यावरही टीका केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसांचे क्षेत्र हे फक्त साडेपाच तालुक्यापुरते राहिले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत ते पांढरे झेंडे घेऊन फिरत असून पांढरा झेंडा हा शरणागतीचा झेंडा असल्याने निवडणुकीपूर्वीच तटकरे यांनी शरणागती पत्करली असल्याची टीका यावेळी गीते यांनी भाषणातून केली.
शिवसेना मेळाव्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील 12 तालुक्यांना अद्यावत रुग्णवाहिका, 20 दिव्यांगाना इलेक्ट्रिक स्कुटरचे वाटप, कचरा गाडी, चेकचे वाटप तसेच ओपन जिमचे वाटप अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच व सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.
या मेळाव्याला संपर्क प्रमुख विलास चावरी, सह संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हाप्रमुख किशोर जैन, रवी मुंढे, रत्नागिरी जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, विजय कवळे, सदानंद थरवळ, राजीव साबळे, बबन पाटील, युवासेनेचे योगेश कदम तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी व हजारोच्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
































































