
राज्य सरकारने अध्यादेश काढून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग सुकर केला. मात्र पुढील महिन्यात 5 ऑक्टोबर रोजी होणाऱया पोट निवडणुकांत मात्र हा अध्यादेश लागू होणार नाही. निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने आरक्षण या निवडणुकीत मिळणार नसल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
धुळे, नंदूरबार, नागपूर, पालघर, अकोला आणि वाशिम या सहा जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांचे 85 निवडणूक विभाग आणि 144 निर्वाचन गणांमध्ये 5 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. येथील निवडणुकांतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची 29 सप्टेंबरची मुदत आहे. मात्र राज्यपालांनी आदेशावर ज्या दिवशी स्वाक्षरी केली त्या दिवसापासून कायदा अस्तित्वात येतो. कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होत नाही. त्यामुळे या अध्यादेशाचा या निवडणुकांवर परिणाम होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.



























































