पाच महिने पगाराविना; काँग्रेस आमदाराविरोधात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांचे वर्चस्व असलेल्या चिखली बाजार समिती कर्मचार्‍यांचे गेल्या पाच महिन्यापासून पगार नसल्यामुळे ऐन सणासुदीत कर्मचार्‍यावर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व कर्मचार्‍यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालय गाठून लेखी निवेदन देवून २५ सप्टेंबर पासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून आपली कैफियत मांडली आहे. कर्मचार्‍यांनी निवेदनात म्हटले आहे की, माहे मे 2018 पासून कार्यालयाकडून आम्हाला आमचे हक्काचा पगार देण्यात आलेला नाही. त्यामुळे आमचे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. मुलांचे शालेय शिक्षणाचा खर्च, जिवनावश्यक खर्च भागविणे आम्हाला अडचणीचे झाले आहे. आम्ही भविष्याचा विचार करून वेतनावर भारतीय जीवन विमा निगमच्या पॉलीसी घेतलेल्या आहे. त्या सुद्धा बंद पडलेल्या आहे. अशा परिस्थितीत एखाद्या कर्मचार्‍याच्या जिवाचे बरे वाईट झाल्यास त्याचे अतोनात नुकसान होवू शकते. सप्टेंबर महिन्यात सर्व सणासुदीचे दिवस असून पैशाअभावी सण साजरे करणे अशक्य होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही कार्यालयीन कामकाज करण्याचे मानसिकतेतत नाही. विनंती की आपणास या निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, 25 सप्टेंबर 2018 मंगळवार पासून आम्ही कर्मचारी कार्यालयीन काम बंद करत आहोत, असे या कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. निवेदनावर लेखापाल आर. जे. शेटे, डी.आर. जाधव, जी.एस. देवकर, एस.व्ही. टाकळकर, कु.एम.टी. हिवाळे, ए.जी. पटेल, एस.ए. चिंचोले, एस.जे. येवले, पी.एन. देशमुख, एस.एन. काळे, अनिता चव्हाण, डी.आर. शिंपणे, एस.ई. सुरडकर, आर.सी. बनसोडे, एस.ए. बिजोरे, पी.जी. खरात  यांच्या सह्या आहेत.

काही वर्षापूर्वी जिल्ह्यातील सधन बाजार समिती म्हणून चिखली बाजार समितीचे नाव होते. परंतु ही बाजार समिती आमदार राहुल बोन्द्रेच्या ताब्यात गेल्यापासून भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणामुळे गाजत असून सहकार मंत्र्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. सदर बाजार समिती बरखास्त करावी अशी मागणी विरोधकांनी शासनाकडे केली आहे. अनेक प्रकरणाची चौकशी देखिल सहकार मंत्र्याच्या आदेशाने झाली आहे. अनेक प्रकरणात चौकशीत भ्रष्टाचार अनियमितता सिद्ध झाली आहे, परंतु सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.