अंबाबाई मंदिरात यापुढे पारंपरिक कपडय़ांतच या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कोल्हापूर

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यापुढे भाविकांनी पारंपरिक पोषाखातच दर्शनाला यावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून करण्यात आले आहे. काही भाविक अत्यंत तोकडय़ा कपडय़ांत दर्शनासाठी येतात याची इतर भाविकांनी केलेल्या तक्रारीवरून समिती पदाधिकाऱ्यांच्या आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिली. याबाबत कायदा करायचा असेल तर तो विधी व न्याय खात्याकडून करावा लागतो; पण समितीकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नवरात्रोत्सवाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी काही भक्त मंदिरात अत्यंत तोकडे कपडे घालून दर्शनासाठी येतात. याबाबत अनेक भाविकांनी देवस्थान समितीकडे नाराजी व्यक्त केल्याची बाब देवस्थानच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे यांनी उपस्थित केली होती. त्यावर यापुढे देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी तोकडय़ा कपडय़ांत देवस्थानच्या अखत्यारीतील 3 हजार 42 मंदिरांत येऊ नये, असे आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जर कोणी तोकडय़ा कपडय़ांत आलेच तर त्यांना कपडे बदलण्यासाठी मंदिर परिसरात स्वतंत्र खोली उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही महेश जाधव यांनी सांगितले.