नीरव मोदीच्या कंपनीला दिलासा नाहीच, चित्रांच्या लिलावाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

पंजाब नॅशनल बँकेला कोट्यवधीचा गंडा घालून परदेशात पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या महागडय़ा चित्रांच्या लिलाव प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत हायकोर्टात धाव घेतलेल्या कॅमेलॉट एंटरप्रायझेस या कंपनीला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिलासा देण्यास नकार दिला. चित्रांचा लिलाव कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत हायकोर्टाने कंपनीची याचिका फेटाळून लावली.

आयकर विभागाकडे मोदीची सुमारे 95 कोटी रुपयांची थकबाकी असून या वसुलीसाठी चित्रांचा लिलाव करण्याची परवानगी मुंबईच्या पीएमएलए कोर्टाने दिली आहे. त्यानुसार सॅफ्रन ऑर्ट या कंपनीमार्फत या चित्रांचा ऑनलाइन लिलाव करण्यात येणार आहे. एकूण 68 चित्रांपैकी 19 चित्रे नीरव मोदीच्या मालकीची असून अन्य पेंटिग्ज मोदीच्या कॅमेलॉट एंटरप्रायझेस व इतर कंपन्यांच्या मालकीची आहेत असा दावा करत कॅमेलॉट कंपनीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे.