‘भीमा-कोरेगाव’साठी आंबेडकरी बांधवांना टोलमाफी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bhima-koregaon

सामना प्रतिनिधी । मुंबई

भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला राज्यभरातून जाणाऱया आंबेडकरी बांधवांना राज्य सरकारने यंदा ‘टोलमाफी’ दिली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या निर्देशानुसार ही टोलमाफी देण्यात आली आहे. रिपाइंच्या एका शिष्टमंडळाने तशी मागणी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती.

दरम्यान, भीमा-कोरेगाव येथील पेरणे फाटा येथे सोमवारी दुपारी 3 वाजता रिपाइंतर्फे मानवंदना सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यात रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत.

भीम आर्मीची सभा रद्द; चंद्रशेखर आजाद पुण्यात

उच्च न्यायालय आणि पुणे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांची पुणे शिवाजीनगर एसएसपीएमएस मैदानावर जाहीर सभा रद्द करण्यात आली. या मैदानावर सभेची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. व्यासपीठ उभारण्यात आले होते. सभा रद्द होताच व्यासपीठ आणि मंडप काढण्याचे काम दुपारनंतर सुरू झाले. चंद्रशेखर आजाद यांच्या सभेसाठी एसएसपीएमएस मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच सभेच्या ठिकाणी लोकांची वर्दळ वाढली होती. परंतु सभा रद्द झाल्याचे जाहीर करताच मंडप उतरवण्यात आला. पाठोपाठ लोकही निघून गेली.