
सामना प्रतिनिधी । शिवडीउगांव
पाणीबाणीच्या प्रादेशिक लढाईला अल्पविराम मिळाला असला तरी पाणीटंचाईचे सावट निफाड तालुक्यावर घोंगावत आहे. तालुक्यातील शिवडी येथील शेतकऱ्याने विहिरींच्या पाण्याची पातळी घसरल्याने द्राक्षबागेवरच कुऱ्हाड चालवली.
निफाड तालुक्यातील शिवडी उगांव वनसगांव परिसरात या वर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. सरासरीइतका पाऊस झाला नाही. नदीनाले ओहोळांतूनही पाणी खळाळले नाही. त्याचा परिणाम एरवी पाण्याने डबडबणाऱ्या विहिरींचा पाझर कमी होत आहे जेमतेम पाण्यावर द्राक्षबागांचे पिक व्यवस्थापन करणे जिकरीचे झाल्याने शिवडी येथील शिवाजी शिंदे यांनी द्राक्षबागेचे पिकच कमी करण्याचा निर्णय घेतला आपल्या शेतातील एक बिघा द्राक्षबाग तोडून टाकली.
अनेक वर्षापासून द्राक्षशेती करत आहे. मात्र पाणीटंचाईची अशी दुष्काळी परिस्थिती कधी अनुभवली नव्हती. विहिरीतील जेमतेम पाण्यावर सर्वच पिके जोपासणे जिकरीचे झाले. त्यामुळे द्राक्षबाग तोडण्याचा निर्णय घेतला.
– शिवाजी शिंदे, द्राक्ष उत्पादक, शिवडी

































































