
मोरबे धरणातून येणाऱ्या पाइनलाइनला लागलेली गळती रोखण्यासाठी आग्रोळी ब्रीज आणि चिखले गावाजवळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणचे पाइप बदलण्यात येणार असल्याने येत्या बुधवारी आणि गुरुवारी नवी मुंबई शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दोन दिवस हे दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
मोरबे धरणातून नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला लागलेली गळती रोखण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या टप्यात अनेक ठिकाणी पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली. आता दुरुस्तीचा दुसरा टप्पा बुधवारपासून सुरू करण्यात येणार आहे. हे काम गुरुवारी दुपारपर्यंत पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्यातील कामात आग्रोळी ब्रीजजवळ रेल्वे मार्गालगत असलेली पाइपलाइन बदलण्यात येणार आहे. तसेच चिखले गावानजीकच्या ब्रीजखालीही नवीन पाइप टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई शहराचा पाणीपुरवठा बुधवारी दुपारी 12 पासून गुरुवारी दुपारी 12 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली नोडमध्ये दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
ठाण्यातही पाणी बंद
ठाणे – कळवा, दिवा, मुंब्रा या भागात पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसीची जलशुद्धीकरण केंद्रातील अशुद्ध पाण्याची वाहिनी आज फुटली. त्यामुळे या भागांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. या दुरुस्ती कामासाठी 15 तास लागणार असल्याने तोपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी या तीनही भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागला आहे. औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील 1 हजार 800 मिमी व्यासाची अशुद्ध पाण्याची वाहिनी फुटली. त्यानंतर त्वरित या जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे काम पूर्ण होण्यास 12 ते 15 तास लागणार असल्याचे एमआयडीसीने सांगितले. या दुरुस्तीच्या कालावधीत दिवा, मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती येथील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. तरी कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे पालिकेने केले आहे.