संजय राठोडसह 61 आमदारांना घरी बसवू! बंजारासह 14 विमुक्त जमातीचा सरकारला इशारा

राज्य सरकारने काढलेली रक्तनातेसंबंधित 2017 ची अधिसूचना रद्द करावी आणि बोगस जात प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थी व देणाऱ्या अधिकाऱ्यांवर विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करून गुन्हे दाखल करावे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर बंजाराबहुल मतदारसंघातील संजय राठोडसह 61 आमदारांना घरी बसवू, असा इशारा जन आक्रोश महामोर्चाने आज दिला.

नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज बंजारासह 14 विमुक्त जमातींच्या वतीने गोर सेनेने आक्रोश महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. बंजारासह 14 जमातींना अंधारात ठेवून बोगस घुसखोरांना मागच्या दारातून बोगस जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून भाजप सरकारने अधिसूचना काढली. त्यामुळे विमुक्त जाती प्रवर्गात प्रचंड बोगस घुसखोरी वाढली. हे पाप भाजप सरकारचे असल्याचे प्रा. संदेश चव्हाण म्हणाले. मोर्चात शिवसेनेचे वाशीम माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष राठोड, बंजारा कर्मचारी संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मोहन चव्हाण, राजपूत भामटा समाजाचे नेते डॉ. अनिल सोळंके, वडार समाजाचे नेते डॉ. रामकृष्ण काळापाड आदी मोर्चात सहभागी झाले होते.