
शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार तानाजी मुटकुळे यांनी शुक्रवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजपा, शिवसेना, महायुतीचे कार्यकर्ते, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आमदार तानाजी मुटकुळे यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आडगाव येथे वडील सखारामजी मुटकुळे व आई मंजुळाबाई मुटकुळे यांचे आशीर्वाद घेतल्यावर ग्रामदैवत हनुमान मंदिरात अभिषेक केला. त्यानंतर हिंगोली येथे गांधी चौकात सभा घेऊन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. गांधी चौकात झालेल्या सभेत तानाजी मुटकुळे यांनी पाच वर्षांमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीच्या सरकारने हिंगोली विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील सिंचन, रस्ते, शिक्षण, आरोग्य अशा विकासकामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे. राहिलेली विकासकामे येत्या पाच वर्षात पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन केले.

































































