मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आयुक्त मुंढे यांच्यावरील अविश्वास मागे

12

सामना ऑनलाईन । नाशिक

करवाढीच्या मुद्दय़ावरून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने मागे घेण्यात आला आहे. त्यासाठीची उद्या शनिवारची महासभाही रद्द केल्याचे महापौर रंजना भानसी यांनी कळविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दणक्याने भाजपाच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांची मात्र पुरती बोलती बंद झाली आहे.

करयोग्य मूल्य दर ठरविताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह बांधीव मिळकतींवर भरमसाठ करवाढ लादली, नगरसेवक निधीलाही कात्री लावली. यामुळे जनतेत आणि नगरसेवकांत प्रचंड असंतोष उफाळला. संपूर्ण करवाढ रद्द व्हावी यासाठी सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्त मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केला. यासाठी उद्या शनिवारी विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. मुंढे यांनी गुरुवारी करवाढीत पन्नास टक्के कपात केली, त्याच दिवशी रात्री त्यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीष महाजन यांनी महापौरांना दिले. त्यानुसार महापौरांनी शनिवारी होणारी अविश्वास प्रस्तावाची विशेष महासभा रद्द केली आहे. या दणक्याने महापौरांसह भाजपा पदाधिकारी, शहरातील आमदार आणि नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांची बोलती बंद झाली आहे.

शिवसेनाच दिलासा देणार – बोरस्ते
भाजपाची नौटंकी उघड झाली आहे. करवाढ ही मुख्यमंत्र्यांचीच देणगी आहे, हेही स्पष्ट झाले आहे. करवाढ सरसकट रद्द व्हावी, यावर शिवसेना ठाम आहे. आता जनतेच्या दरबारात भाजपाच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यात येईल, असे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सांगितले. आयुक्त मुंढे यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून नाशिककरांना वेठीस धरले जात आहे. शहरातील भाजपाचे तीनही आमदार निक्रिय आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना नाशिकमधील या परिस्थितीची माहिती देण्यात येईल. शिवसेनाच जनतेला दिलासा देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समर्थकांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पोहचविणार – मुंढे
अविश्वास प्रस्तावाला विरोध करीत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनार्थ आम्ही नाशिककर या बॅनरखाली शेकडो नागरिकांनी महापालिका प्रवेशद्वारावर सकाळी निदर्शने केली. प्रवेशद्वारावर येवून आयुक्तांनी या समर्थकांचे आभार मानले. त्यांच्या भावनांचे निवेदन आपण मुख्यमंत्र्यांकडे पोहचविणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांना सांगितले. कर्तव्यदक्ष आयुक्तांची नाशिकच्या विकासासाठी गरज आहे, त्यांची बदली करण्यात येवू नये, अशा आशयाचे मुख्यमंत्र्यांसाठीचे निवेदन शिष्टमंडळाने आयुक्तांना सादर केले.

आपली प्रतिक्रिया द्या