नवीन शेवा ग्रामपंचायतीचे सरपंच निशांत घरत यांच्याविरोधातील अविश्वासाचा ठराव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवीन शेवा ग्रामपंचायतीचे भाजपचे थेट नागरिकांमधून सरपंचपदी निवडून आलेल्या निशांत घरत यांच्याविरोधात शिवसेना सदस्यांनी दाखल केलेला अविश्वासाचा ठराव शुक्रवारी 8 विरुद्ध 2 मतांनी मंजूर करण्यात आला आहे. येत्या सात दिवसात ग्रामसभेत होणाऱ्या मतदानानंतरच जिल्हाधिकारी पुढील कारवाईबाबत अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.

नवीन शेवा ग्रामपंचायतीचे भाजपमध्ये दाखल झालेले सरपंच निशांत घरत यांच्याविरोधात शिवसेनेच्या 9 सदस्यांनी अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. कामातील अनियमितता आणि सदस्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले जात नसल्याचे विविध आरोप करीत दाखल करण्यात आलेल्या अविश्वासाच्या ठरावावर निर्णय घेण्यासाठी उरण तहसीलदारांनी विशेष सभा बोलावली होती. शुक्रवारी उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली बोलावण्यात आलेल्या विशेष सभेत यावर चर्चा झाली. चर्चेअंती घेण्यात आलेल्या मतदानात सरपंच निशांत घरत यांच्याविरोधातील अविश्वासाचा ठराव 8 विरुद्ध 2 मतांनी मंजूर करण्यात आला आहे. मतदानाचा अहवाल रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. ग्रामसभा घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील. नव्या कायद्यानुसार ग्रामसभेत मतदान घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच सरपंच निशांत घरत यांच्याविरोधातील अविश्वासाच्या ठरावावर अंतिम निर्णय होईल, अशी माहिती नायब तहसीलदार संदीप खोमणे यांनी दिली.