नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेन पॅलेस्टाईनला मान्यता देणार; इस्रायलने राजदूतांना परत बोलावले

एकीकडे इस्रायल आणि हमास यांच्यातील रक्तरंजित संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना दुसरीकडे नॉर्वे, आयर्लंड आणि स्पेनने पॅलेस्टाईनला औपचारिकरीत्या मान्यता देण्याची घोषणा केली आहे. पुढच्या आठवडय़ात हे देश पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याची घोषणा करू शकतात. यामुळे नाराज झालेल्या इस्रायलने या देशांमधील आपल्या राजदूतांना परत बोलावून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आयर्लंडसारख्या देशाने पॅलेस्टाईनला मान्यता देणे दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याची टीका इस्रायलचे परराष्ट्रमंत्री काट्ज यांनी केली आहे. याप्रकरणी इस्रायल ठोस पाऊल उचलेल असेही त्यांनी म्हटले आहे. पॅलेस्टाईनला मान्यता देण्याचा निर्णय गाझातील इस्रायलींची घरवापसी आणि युद्धविरामाच्या प्रयत्नांमध्ये बाधा आणू शकतात, असेही काट्ज यांनी म्हटले आहे.

140 हून अधिक देशांची पॅलेस्टाईनला मान्यता

जगभरातील तब्बल 140 हून अधिक देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिली आहे; परंतु अनेक युरोपीय देश आणि अमेरिकेने यासाठी विरोध केला आहे. पॅलेस्टाईन संयुक्त राष्ट्रांचा कायम सदस्य बनू शकत नाही म्हणून अमेरिकेने एक पाऊल मागे घेतले आहे, तर हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्रांमध्ये पॅलेस्टाईनच्या कायम सदस्यत्वासाठी समर्थन दिले आहे.

मध्यपूर्वेत शांततेसाठी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची गरज नॉर्वे

मध्यपूर्वेत शांतता नांदावी असे वाटत असेल तर पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गार स्टोर यांनी म्हटले आहे. पुढच्या आठवडय़ात 28 मे रोजी पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, स्पेन, आयर्लंड, स्लोवेनिया आणि माल्टा या देशांशी चर्चा करून लवकरच पॅलेस्टाईनला देश म्हणून मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी म्हटले होते.