पावसाने राहुरीकरांना हुल दिल्याने भ्रमनिरास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । राहुरी

वातावरणात चांगली निर्मिती झाल्याने दमदार पावसाचे आगमन होण्याचे अंदाज बांधण्यात आले. मात्र नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील पावसाने राहुरीकरांना हुल दिल्याने भ्रमनिरास झाला आहे. दरम्यान ४ दिवसांपूर्वी कोतुळ कडुन निघालेले पाणी आज मंगळवारी दुपारी ३ वाजता राहुरीच्या मुळा धरणात दाखल झाले आहे.

राहुरी तालुक्यात आज सकाळ पासुनच ढगाळ वातावरण तयार झाले होते. दुपारी १२ वाजता रिमझिम पावासाला सुरवात झाली. मात्र अवघ्या अर्ध्या तासात पावसाच्या सरी मावळल्याने दमदार पावसाचे आगमन होईल या शेतक-यांच्या अपेक्षा हवेत विरल्या आहेत. ८ जूनला सुरू झालेल्या मृग नक्षत्राचा संपुर्ण कालावधी कोरडा गेला आहे.तर २३ जूनला आद्रा नक्षत्राची सुरवात होऊन दोन वेळा तासभर तर एक वेळेस दोन तास पावसाने हजेरी लावली आहे. ५ जुलैला आद्रा नक्षत्राचा शेवट दिवस आसुन ६ जुलै पासुन पुर्नवसु नक्षत्राला प्रारंभ होणार आहे.

मृग तसेच आद्रा नक्षत्रातील महिनाभराचा कालावधी पाहता पावसाच्या आगमनाची अवस्था हवी तितकी समाधानकारक ठरलेली नाही. लाभक्षेत्रात गुंगारा देणा-या पावसाने मंगळवारी रात्री घाटमाथ्यावर हजेरी लावल्याने आज सकाळी ६ वाजता कोतुळ कडुन मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९७७ क्युसेकने पाण्याची आवक सुरू झाल्याने दुपारी ३ वाजता मुळा धरणात नव्याने पाणी दाखल झाले आहे.

आंबीत व पिंपळगाव खांड ही छोटी धरणे भरल्यानंतर मुळा नदी वाहती झाली आहे. गेल्या ४ दिवसातून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नव्या पाण्याचा प्रवास सुरू झाला होता. सोमवारी रात्री घाटमाथ्यावर झालेल्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक आज मंगळवार सकाळ पासुन काही प्रमाणात वाढण्यास मदत झाली. दुपारी ३ वाजता कोतुळ कडुन निघालेले पाणी राहुरीच्या मुळा धरणात दाखल झाले आहे.

२६ हजार दशलक्ष घनफुट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील आजचा पाणीसाठा ४७५९ दशलक्ष घनफुट होता. मागील वर्षी आजच्या दिवशी धरणातील पाणीसाठ्याची ५ हजार ९४२ दशलक्ष घनफुट नोंद झाली होती. राहुरी कृषी विद्यापिठातील भारत मौसम विज्ञान विभागाचे ४ ते ८ जूलै या कालावधीतील अंदाज आज मंगळवारी वर्तविण्यात आले आहेत. या कालावधीत कमाल आद्रता ८र्क ते ८३ टक्के तसेच वा-याचा वेग ताशी १५ ते २२ किलोमीटर राहणार आहे.५ दिवसातील कमाल तापमान ३र्क ते ३५ अंश सेल्सिअस व आकाश ढगाळ राहणार असल्याने तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान अंदाजात समावेश आहे.

कृषी विद्यापीठातील हवामानावर आधारीत असलेल्या पावसाच्या अंदाजाची गेल्या महिन्याभरातील अवस्था कभी खुशी कभी गम अशीच राहिली आहे.