
हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट चालू असल्याने तिथे जाऊ नये, असे आवाहन अमेरिकेने त्यांच्या नागरिकांना केले आहे. वैज्ञानिक माहितीवर आधारित प्रवास सूचना अमेरिकेत वेळोवेळी जाहीर करण्यात येत असतात. त्यानुसार सध्या हिंदुस्थानात करोनाची दुसरी लाट सुरू असून तेथे लोकांनी प्रवास करू नये, असे सेंटर फॉर डिसीज अँड कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सीडीसीने कोविड 19 बाबत हिंदुस्थानात प्रवेश करू नये यासाठी चार क्रमांकाचा इशारा जारी केला असून हिंदुस्थानात कोरोनाची लाट गंभीर असल्याचे म्हटले आहे. कोविड 19 साथरोग हा मानवतेला प्रचंड मोठा धोका असून प्रवाशांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच कुणीही हिंदुस्थानात प्रवास करू नये. लस घेतलेल्यांनीही हिंदुस्थानात जाऊ नये, असा इशारा सोमवारी सीडीसीने दिला आहे.
लशीचा कच्चा माल पुरवण्याबाबत मौन
हिंदुस्थानच्या कोरोना लशीसाठी लागणाऱया कच्च्या मालाच्या वा औषधी घटकांच्या गरजा आम्ही समजू शकतो. त्यावर विचार करणार असल्याने आताच ठोस काही सांगता येणार नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना टॅग करून ट्विट केले आहे. त्यात अमेरिकेने कोविड प्रतिबंधक लशीसाठी लागणाऱया कच्च्या मालाचा पुरवठा हिंदुस्थानला करावा, त्यामुळे पुरेशी लसनिर्मिती होईल, असे म्हटले आहे.





























































