
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काळय़ा पैशाला पायबंद घालण्यात ‘नोटाबंदी’चा काडीचाही उपयोग झालेला नाही, असे खडे बोल माजी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीतून मोदी सरकारला सुनावले आहेत. पाच राज्यांमध्ये सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तब्बल 200 कोटी रुपये जप्त केले असून जप्तीची ही रक्कम ‘विक्रमी’ आहे, असे त्यांनी सांगितले.
जानेवारीत मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतलेल्या रावत यांची 11 महिन्यांची कारकीर्द निवडणुकांनी व्यापलेली राहिली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांत सध्या विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्याआधी त्रिपुरा, मेघालय, नागालॅण्ड, कर्नाटक या चार राज्यांच्या निवडणुका झाल्या. रावत हे शनिवारी निवृत्त झाले.
निवडणुकांमध्ये महापुरासारखा वाहणारा काळा पैसा हा अतिशय प्रभावी स्रोतांकडून येत असतो. नोटाबंदीसारख्या उपाययोजनांचा त्यांच्यावर अजिबात परिणाम होत नाही, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले. ओ. पी. रावत यांनी मोदी सरकारच्या नोटाबंदीचे अपयश साधार पटवून दिले आहे. त्यामुळे नोटाबंदीद्वारे काळय़ा पैशाला लगाम घालण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळगलेले उद्दिष्ट काही सफल झाले नाही, यावर आता शिक्कामोर्तबच झाले आहे. मोदी यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये 500 रुपये आणि 1 हजाराच्या नोटा अचानक बाद करून नोटाबंदी केली होती.
निवडणुकांना मोठा धोका सोशल मीडियाचा
हिंदुस्थानातील निवडणुकांना सर्वात मोठा धोका हा सोशल मीडियापासून आहे, असा इशाराही रावत यांनी दिला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने फेसबुक आणि ‘ट्विटर’शी चर्चा केली आहे. निवडणुकांवर विपरीत परिणाम करणाऱया गोष्टी सोशल साइटस्वर घडू न देण्याची दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’ यांनी दिली आहे. तसेच निवडणुकीच्या जाहिरातीच्या बाबतीत प्रायोजकांची नावे आणि त्यासाठी करण्यात आलेल्या खर्चाचा आकडा जगजाहीर करण्याचेही त्यांनी मान्य केले आहे, अशी माहिती माजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली.
सुनील अरोरांपुढे लोकसभा आणि सहा राज्यांतील निवडणुकांचे आव्हान
ओ. पी. रावत यांच्या जागी आलेले नवे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज पदाची सूत्री आज हाती घेतली. सध्या होत असलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा निकाल येत्या 11 डिसेंबरला लागणार आहे. त्यानंतर 2019 या नव्या वर्षात अरोरा यांच्यापुढे लोकसभा निवडणुकीबरोबरच जम्मू-कश्मीर, महाराष्ट्र, ओडिशा, हरयाणा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या सहा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे आव्हान आहे.

























































