कुख्यात गँगस्टर रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या ताब्यात, मोक्का प्रकरणात मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 कुख्यात गुंड रवी पुजारी (57) याला ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. रवी पुजारीविरोधात 2017मध्ये मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्याने बांधकाम व्यावसायिकाकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्याला बंगळुरू येथील कारागृहातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कासारवडवली येथील प्रकरणात त्याला अटक करण्यात आली असून त्याला 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मुंबई, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक, सिनेमातील कलाकार, राजकीय नेते यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणीची मागणी करत असे. 90च्या दशकात मुंबई पोलिसांनी अंडरवर्ल्डचा बीमोड करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रवी पुजारी देश सोडून पळून गेला होता, परंतु त्याच्या गुन्हेगारी कारवाया त्याच्या टोळीमार्फत सुरूच होत्या. रवी पुजारी याच्यावर 44 गुह्यांची नोंद आहे. 2017मध्ये ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाला त्याने 10 कोटी रुपयांची खंडणी मागून धमकावले होते. तसेच टोळीच्या माध्यमातून गोळीबारदेखील केला होता. या प्रकरणी त्याच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास यंत्रणांनी 2019मध्ये आफ्रिकेतील सेनेगल येथून रवी पुजारी याला अटक केली होती. ठाण्यात रवी पुजारीविरोधात खंडणी आणि मोक्का अंतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू आहे.