कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूरला सात दिवसांची कोठडी,

– विरारमधील बिल्डर समय चौहान यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेला कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर याला आज सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या काळात त्याची कसून चौकशी केली जाणार असून चौहान यांच्या हत्येचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. दरम्यान, या हत्याकांडातील आरोपींची संख्या आता १४ इतकी झाली असून ठाकूर याच्या अटकेमुळे आतापर्यंत उघड न झालेल्या अनेक बाबींचा छडा पोलिसांना लागणार आहे.
बिल्डर समय चौहान यांच्या हत्येचे गूढ उकलणार

जे. जे. हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या दाऊदचा हस्तक सुभाषसिंग ठाकूर हा उत्तर प्रदेशमधील फत्तेहगढ मध्यवर्ती तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. विरारमधील बिल्डरच्या हत्येतही त्याचा प्रमुख सहभाग असून या प्रकरणात त्याला अटक करण्याचे यापूर्वीचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. वसई-विरारचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी मंगळवारी विशेष टीम पाठवून फत्तेहगढच्या तुरुंगातून ठाकूर याचा ताबा घेतला.

वकिलांचा युक्तिवाद

सुभाषसिंग ठाकूर याला सोमवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात मुंबई विमानतळावर आणण्यात आले. त्यानंतर भाईंदर टेंभा रुग्णालयात त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आज सकाळी ठाकूर याला ठाण्याच्या मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालय परिसरातही मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायमूर्ती व्ही. जी. मोहिते यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकारी वकील संजय मोरे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, चौहान यांच्या हत्येत ठाकूर याची महत्त्वाची भूमिका आहे.

हत्येसाठी किती रक्कम दिली?

यासंदर्भात अधिक चौकशी करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सरकारी वकिलांनी मागितली. ती न्यायालयाने मंजूर केली असून २२ डिसेंबर रोजी ठाकूर याला पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. चौहान यांच्या हत्येसाठी किती आर्थिक देवाणघेवाण झाली, आरोपीला किती पैसे मिळाले याचा खुलासा होण्याची शक्यता असल्याचे सरकारी वकील संजय मोरे यांनी सांगितले.