देशाच्या राज्यघटनेला धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

देशाच्या राज्यघटनेला धोका निर्माण झाला असून देशात एकाच संस्कृतीचा प्रभाव जाणवत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षेची भावना असल्याचे मत गोव्याचे आर्च बिशप फिलीप नेरी फेराओ यांनी एका पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. दिल्लीतील आर्च बिशप अनिल काऊटो यांनी १५ दिवसांपूर्वी देशातील धर्मनिरपेक्षतेला धोका असल्याचे वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला होता.

देशाच्या राज्यघटनेच्या रक्षणासाठी कॅथलिक ख्रिश्चनांनी राज्यघटनेचा अभ्य़ास करून ती समजून राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. विकासाच्या नावाखाली गरीबांचे अधिकार, मानवाधिकार पायदळी तुडवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. लोकांच्या खाण्यापिण्यापासून ते पूजाअर्चेपर्यंत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

पत्रातील विधानांचा चुकीचा अर्थ लावला

पत्रकावरून वाद सुरू झाल्यावर आर्च बिशप यांच्या सचिवांनी याबाबत खुलासा केला आहे. दरवर्षी अशा प्रकारचे पत्र प्रसिद्ध करण्यात येते. या वर्षी पत्रातील काही विधानांचा चुकीचा अर्थ लावल्याने वाद होत आहे. आमच्या वेबसाइटवर असलेले पत्र पूर्ण वाचल्यास संदर्भ समजतील असे त्यांनी म्हटले आहे. देशातील लोकशाहीला मजबूत करण्याची गरज आहे. त्यासाठी भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी सामान्य नागरिकांनीही राजकारणात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.