जसलोक बनले कोरोना रुग्णालय; पूर्णपणे कोरोनासाठी असलेले पहिले खासगी रुग्णालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी आणि वेळेत दर्जेदार उपचार मिळण्यासाठी मुंबई महापालिकेने जसलोक या सुपर स्पेशालिटी खासगी रुग्णालयाला पूर्णपणे कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला आहे. तातडीने याची कार्यवाही करा, असे आदेश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले आहेत. जसलोकमध्ये सध्या 75 आयसीयू बेडसह 364 बेड्स आहेत. त्यात आणखी 40 आयसीयू बेडसह 250 बेड वाढवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे एकूण बेडची संख्या 614 वर पोहोचणार आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे पूर्णपणे कोरोनासाठी असलेले मुंबईतले जसलोक हे पहिले खासगी रुग्णालय ठरले आहे.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट सुरू असून रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांना बेड कमी पडू नयेत यासाठी पालिका रुग्णालये, जम्बो रुग्णालयांतील बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांबरोबर टायअप करत पंचतारांकित हॉटेल्समध्ये उपचारांची सुविधा सुरू केली आहे. दरम्यान, बीकेसीतील ट्रायडंटमध्ये रिलायन्स रुग्णालयाच्या मदताने 20 बेड आणि मरीन ड्राइव्ह येथील इंटर काँटिनेंटल हॉटेलमध्ये बॉम्बे रुग्णालयाच्या मदतीने 22 बेड आजपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आजपासून सेव्हन हिल्समध्ये 30 आयसीयू बेड उपलब्ध झाले असून येत्या आठवडाभरात नेस्को कोरोना केंद्रात 1500 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

  • रुग्णालयात विशेष वॉर्डमध्ये अॅडमिट असलेले पण प्रकृती स्थिर असलेले, डॉक्टरांच्या वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देणार आहे.
  • नव्याने कोणत्याही नॉन-कोविड रुग्णांना अॅडमिट करता येणार नाही. अॅडमिट असलेले पण अत्याधिक वैद्यकीय देखरेखीची आवश्यकता असलेल्या नॉन-कोरोना रुग्णांना 48 तासांच्या आत दुसऱया रुग्णालयांमध्ये हलवण्यात येणार आहे.
  • तातडीच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही अशा सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

मुंबईतील रिक्त बेड्सची संख्या

  • जम्बो कोरोना, कोरोना सेंटर्स – 5 हजार 982 बेड्स
  • पालिका, खासगी रुग्णालये – 4 हजार 105 बेड्स
  • एकूण आयसीयू बेड – 41
  • एकूण ऑक्सिजन बेड – 1 हजार 444
  • एकूण व्हेंटिलेटर्स बेड्स – 15

कोरोना रोखण्यात जसलोकचे योगदान

मुंबईत सुरुवातीला कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली जसलोक रुग्णालय प्रशासनाने कोरोना रुग्णांसाठी बेडची सुविधा देण्यास सुरुवात केली होती. ही सेवा देताना जसलोकमधील डॉक्टर, परिचारिका तसेच इतर आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली, मात्र कोरोनाला रोखण्यासाठी जसलोक रुग्णालयाने नेहमीच सहकार्य करून योगदान दिले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता कोरोनाच्या दुसऱया लाटेला थोपवण्यासाठी जसलोक रुग्णालयांचे रूपांतर पूर्णपणे कोरोना रुग्णालयात करण्याचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करा, असे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.