
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुंबई शहरासाठीच्या 2019-20 च्या प्रारूप आराखडय़ास मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 120 कोटी 61 लाख रुपयांच्या या प्रारूप आराखडय़ास मंजुरी देताना मुंबईसाठी वाहनतळ प्राधिकरण स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शिवाजी पार्क मैदानात भूमिगत पार्किंगतळ उभारण्याची सूचना या बैठकीत करण्यात आली होती, पण शिवाजी पार्क मैदानाला हेरिटेज दर्जा असल्याने मैदानात भूमिगत पार्किंग शक्य नसल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले
उद्योगमंत्री व पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला पालक सचिव भूषण गगराणी, महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे उपस्थित होते. तसेच बेस्ट, मुंबई पोर्ट ट्रस्ट, म्हाडा, महानगरपालिकेचे अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
समुद्राची खोली वाढवा
दादर परिसरात पिंडदानासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. समुद्रात जाताना अनेक अडथळे येतात. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यायी खोली तयार करण्याची सूचना सुभाष देसाई देसाई यांनी केली.
माहीमची अतिक्रमणे हटवा
माहीम चौपाटीचे सुशोभीकरण करताना त्या ठिकाणी असलेल्या बांबूच्या वखारीमुळे समुद्राचे नयनरम्य दृश्य न्याहाळता येत नाही. त्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची सूचना यावेळी केली.
– मुंबई शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे पार्किंगची समस्या गंभीर बनली आहे. पार्किंगच्या समस्येवर मात करण्यासाठी मुंबईत वाहनतळ प्राधिकरण (पार्किंग ऑथोरिटी) स्थापन केले जाणार आहे. यासाठी काही नियोजन अधिकारी नियुक्त करून पार्किंगच्या ठिकाणांची पाहणी केली जाईल, अशी माहिती अजोय मेहता यांनी दिली.
– रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत काही ठिकाणी पार्किंग झोन राखीव ठेवण्याची सूचना काही लोकप्रतिनिधींनी केली. तसेच शिवाजी पार्क परिसरात भूमिगत पार्किंग सेंटर सुरू करण्याची सूचना यावेळी केली, परंतु हे मैदान हेरिटज असल्याने या ठिकाणी पार्किंग उभारण्यास नकार देण्यात आला.



























































