जगभरातील हिंदुस्थानींचा देशासाठी मदतीचा हात; सुंदर पिचाई, लक्ष्मी मित्तल यांची मोलाची मदत

हिंदुस्थानात आलेल्या कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतून देशवासीयांना बाहेर काढण्यासाठी जगभरातील हिंदुस्थानींनी प्रयत्न सुरू केले आहेत. ऑक्सिजन कॉन्सट्रेटरपासून ते थेट आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी पूर्ण ताकद लावली आहे. सुंदर पिचाई, लक्ष्मी मित्तल यांसारख्या दिग्गज उद्योजकांनी हा ध्यासच घेतला असून असून त्या त्या देशातील सरकारांवर दबाव आणून त्यांना हिंदुस्थानची मदत करण्यास भाग पाडले जात आहे.

परदेशात यासाठी एक फंड तयार केला जात असून अनेक देशांत कोरोनाग्रस्त नागरिकांसाठी निधी गोळा करण्यासाठी हिंदुस्थानी वंशाचे नागरिक पुढे आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या जसप्रीत राय या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर बनवणाऱया कंपनीच्या मालक आहेत. त्यांनी 30 हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटर हिंदुस्थानला पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी त्यांनी आपल्या 100 कर्मचाऱयांना एक मोहीमच दिली असून मेअखेरपर्यंत हे कॉन्सट्रेटर हिंदुस्थानात दाखल होणार आहेत. त्याचप्रमाणे विविध देशांतील हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकांनी आपल्या देशातील दूतावासांमार्फत विविध वैद्यकीय साहित्य हिंदुस्थानात पाठविण्यासाठी तेथील सरकारवर दबाव आणला आहे. त्याचप्रमाणे शिकागोमधील सुधीर रवी यांनी हिंदुस्थानातील रुग्णालयांना 11 औद्योजिक  दर्जाचे ऑक्सिजन जनरेटर देण्याची तयारी दर्शविली आहे. हे जनरेटर पुढील सहा महिन्यांपर्यंत तब्बल 50 हजार लोकांना ऑक्सिजन पुरवू शकतात.

कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अब्जोपतींचे औदार्य

परदेशातील हिंदुस्थानी वंशाच्या अब्जोपतींनी आपली तिजोरी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी अक्षरशः खुली केली आहे. टेक इनव्हेस्टर विनोद खासला यांनी विमानाद्वारे वैद्यकीय साहित्य पाठविण्याची तयारी दर्शविली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई वैद्यकीय उपकरणांसाठी 80 लाख डॉलरची मदत करणार आहेत. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी वैद्यकीय साहित्याच्या पुरवण्यासाठी नेटवर्क बनविण्याची  तयारी केली आहे. त्याचप्रमाणे ब्रिटनमधील ‘स्टील सम्राट’ लक्ष्मी मित्तल, करण बिलिमोरियो यांच्याकडून हिंदुस्थानला हवी ती मदत पाठवली जात आहे. मोहसीन आणि जुबेर इसा ज्यांचे मूळ गुजरातमध्ये आहे त्यांनी गुजरातमधील चार रुग्णालयांसाठी 35 लाख डॉलरची मदत पाठवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या