
अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेस खासदार नुसरत जहां पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नुसरतबाबत एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमुळे हलकल्लोळ माजला आहे. नुसरत जहाँ ही गर्भवती असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नुसरत आणि तिचा नवरा निखील जैन यांच्यात बिनसलं असून दोघे वेगळे होण्याच्या मार्गावर असल्याची कुजबूज सुरू आहे. यातच नुसरतचं आणि अभिनेता यश दासगुप्ता यांचं प्रेमप्रकरण सध्या जोरात सुरू असल्याचंही बोललं जात आहे.

तस्लिमा नसरीन यांनी बंगाली भाषेत फेसबुक पोस्ट लिहिली आहे, ज्याबद्दल आजतक वृत्तवाहिनीने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. तस्मिला यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की “नुसरतची बातमी सध्या चर्चेत आहे. ती गर्भवती आहे. तिच्या नवऱ्याला याबाबत काहीच माहिती नाहीये. दोघेही सहा महिन्यांपासून वेगळे राहात आहेत. नुसरत ही यश नावाच्या अभिनेत्याच्या प्रेमात आहे.”

नसरीन यांनी पुढे म्हटलंय की लोकांना वाटतंय की नुसरतच्या पोटातील मुलाचा बाप हा निखील नसून यश आहे. यावरून तस्लिमा यांनी प्रश्न विचारला आहे की ‘ही गोष्ट खरी आहे किंवा खोटी माहिती नाही, मात्र असंच चालू राहिलं तर नुसरत आणि निखीलने वेगळं होणं योग्य नसेल का? वटवाघळाप्रमाणे नातं लटकत ठेवण्यात अर्थ नसून याचा दोघांनाही त्रास होईल.’ नुसरत आणि निखील यांचं लग्न झाल्याने मला आनंद झाला होता असं नसरीन यांनी लिहिलं आहे. दोन भिन्न धर्माच्या लोकांत लग्न होत असेल तर मला आनंद होतो असं नसरीन यांचं म्हणणं आहे.

आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्नांमुळे जाती, धर्माचे पडदे दूर होतील असं नसरीन यांचं म्हणणं आहे. नुसरत आणि निखील यांच्या लग्नाबाबत बोलताना त्या पुढे म्हणाल्या की, ‘कोणाला माहिती होतं की अशा सुंदर जोड्या फार काळ नांदणार नाहीत’. नुसरत आणि निखील यांनी जून 2019 मध्ये लग्न केलं होतं.

तुर्कस्थानमध्ये त्यांनी आलिशान पद्धतीने एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र दोघांच्या नात्यात आता वितुष्ट निर्माण झालं आहे. त्यातच नुसरत आणि यश यांच्या प्रेमप्रकरणाच्या वावड्या उठायला लागल्या. यश हा भाजप समर्थक असून नुसरत ही टीएमसी समर्थक आहे. बंगाल निवडणुकीच्या काळात अभिनेता यश याने नुसरतसोबतचे आपले संबंध हे व्यावसायिक स्वरुपाचे असून आम्ही दोघेही वेगवेगळ्या पक्षांचे समर्थक असल्याचं म्हटलं होतं.



























































