महापालिकेच्या दवाखान्यांत मिळणार आहारतज्ञांचा सल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या 183 दवाखान्यांमध्ये आता आहारतज्ञांचा सल्ला मिळणार आहे. यामुळे आहाराच्या असमतोलामुळे होणारे आजार टळण्यास मदत होणार असून उपचारांसाठी पालिकेच्या दवाखान्यात येणाऱया गोरगरीबांना याचा मोठा फायदा होणार आहे.

पालिकेने गेल्या वर्षी मुंबईतील एक लाख नागरिकांची तपासणी केली होती. यातील 2 हजार 415 जणांमध्ये मधुमेह आढळला होता, तर 20 टक्के नागरिकांमध्ये प्री-डायबिटीक लक्षणे आढळली होती. पालिकेच्या या उपक्रमांतर्गत गेल्या वर्षीपर्यंत 144 दवाखान्यांत आहारतज्ञांची नियुक्ती करण्यात आली होती. यात वाढ करून एप्रिल महिन्यापासून 183 दवाखान्यांमध्ये आहारतज्ञांची सुविधा उपलब्ध होणार आहे. इंडियन डाएटीस असोसिएशनचे तज्ञ सामान्यांनाही आहाराबाबत मार्गदर्शन करणार आहे. पालिका या संस्थेला 43 लाख 92 हजार रुपयांचे शुल्क देणार आहे. दिवसातील काही तास हे आहारतज्ञ हे दवाखान्यांमध्ये उपलब्ध राहतील.