
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी 30 डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे. काही वर्तमानपत्रांमध्ये शपथविधीचा हा कार्यक्रम दुपारी दोनच्या आतच उरकण्याची सूचना राजभवनाकडून राज्य सरकारला मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्तामुळे राजभवनाने स्पष्टीकरण दिले असून शपथविधी सोहळा दोनच्या आत उकरण्याच्या कोणत्याही सूचना राज्य सरकारला दिल्या नसल्याचे यात म्हटले आहे. या स्पष्टीकरणात शपथविधी दोनच्या आत उरकाव्या अशा कोणत्याही लेखी किंवा तोंडी सूचना राज्य सरकारला दिल्या नसल्याचे म्हटले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला शपथविधीचा कार्यक्रम दुपारी दोनच्या आत संपवावा, अशी तोंडी सूचना राजभवनवरील राज्यपाल कार्यालयाकडून आल्याचे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये म्हटले होते. मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी दुपारी एकची वेळ मागणारे पत्र राज्यपाल कार्यालयाला मिळाले असून, राज्यपालांच्या सूचनेनुसार त्यास उत्तर देण्यात येईल, असे राज्यपालांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचे या बातम्यांमध्ये म्हटले होते. सरकारच्या सोयीनुसार शपथविधीची वेळ दिली जाते. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहकारी मंत्र्यांच्या शपथविधीसाठीही त्यांनी सुचवल्यानुसार वेळ दिली होती, असे या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचंही या बातम्यांमध्ये म्हटले होते.

























































