ओबीसी आरक्षणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोवर भाजप स्वस्थ बसणार नाही, या आरक्षणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीच्या समारोपात भाषण करताना देवेंद्र फडणवीस बोलत होते. या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही. या आरक्षणासाठी जनगणनेची नाही, तर एम्पिरिकल डेटाची गरज आहे.आरक्षण द्यायचे जमत नसेल तर आम्हाला सांगा, केवळ चार महिन्यांत करून दाखवितो. नाही करता आले तर पदावर राहणार नाही असे ते म्हणाले.

आरक्षण देण्यासाठी इच्छाशक्ती असावी लागते. 26 जूनचे आंदोलन करून भाजप थांबणार नाही. ओबीसी आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर शांत बसणार नाही. फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून राजकारण केले जात असल्याचे ते म्हणाले. या सरकारने मराठा आरक्षणाचासुद्धा खेळखंडोबा केला असा आरोप त्यांनी केला. यावेळी पंकजा मुंडे, अॅड. आशीष शेलार, मंगलप्रभात लोढा व अन्य नेते उपस्थित होते.