राज्यपालांचा पुन्हा खोडा, आता ओबीसी आरक्षणाचा वटहुकूम अडवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांआधी निर्माण झालेला ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटावा यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून वटहुकूम काढण्यात आला. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपली अडवणुकीची भूमिका कायम ठेवत या वटहुकूमावर आठवडा उलटला तरी स्वाक्षरी केलेली नाही. सहीसाठी आडमुठी भूमिका घेणाऱया राज्यपालांमुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न सुटण्याऐवजी गुंता अधिकच वाढला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली. हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय तसेच ओबीसी संघटनांची बैठक घेतली. त्यावर योग्य तोडगा काढण्याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांचेच एकमत झाले. त्यानुसार आगामी जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वटहुकूम काढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. यासाठी कायदेशीर सल्लाही घेण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडीच्या या निर्णयावरही राज्यपालांची अद्याप स्वाक्षरी झालेली नाही.

आमच्याकडेही कायदेशीर सल्लागार – संजय राऊत

राज्यपालांच्या या वेळकाढूपणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्यपालांना कायदेशीर सल्लागार हवे असतील तर आमच्याकडेही कायदेशीर सल्लागार आहेत. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यासंदर्भात सल्ला घेऊन राज्य सरकारने अध्यादेश काढले होते. राज्यपालांना विलंब करायचाच असेल तर कायदेशीर सल्ला घ्यावा. 12 आमदारांच्या नियुक्त्यांचा निर्णय घ्यायला कायदेशीर अडचण नव्हती. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आठ ते नऊ महिने कायदेशीर सल्ला घेत आहेत, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

भाजपमुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले – नाना पटोले

भारतीय जनता पक्षामुळेच राज्यातील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण धोक्यात आले असल्याचा पुनरुच्चार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्य सरकारने ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी अध्यादेश काढला आहे. मात्र राज्यपालांकडून त्या अध्यादेशावर शंका उपस्थित केली जाते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचे नाही, असेच सिद्ध होत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केला.

राज्यपालांना पडलेला प्रश्न

राज्य सरकारने कायदेशीर सल्ला घेऊनच वटहुकूम काढला असताना राज्यपाल कोश्यारी यांनी मात्र आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ओबसींसंदर्भातील अध्यादेश कसा काढला, असा सवाल केल्याचे समजते. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्याचे नमूद करीत राज्यपालांनी सरकारकडून आणखी कायदेशीर मत मागवले आहे.

15 सप्टेंबरच्या बैठकीत अध्यादेशाचा निर्णय

ओबीसी आरक्षणाच्या मुद्दय़ावरून राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद पोटनिवडणूक जाहीर केली आहे. 5 ऑक्टोबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 15 सप्टेंबर रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

राज्यपाल अध्यादेशावर सही करतील हा विश्वास

माझा राज्यपालांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्यांना काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांवर उत्तर देण्याचे आमचे काम आहे. राज्यपाल निश्चितपणे अध्यादेशावर सही करतील त्याच्यात राजकारण येण्याचे काही कारण नाही. राज्यपाल तसे नाहीत, असा माझा विश्वास असल्याची प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यपालांना काही त्रुटी असतील तर त्यांना पुन्हा दुरुस्ती करून ओबीसी आरक्षणासंदर्भात अध्यादेश पाठवू असे ते म्हणाले. विरोधकांना राज्यपालांकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन करणार का, या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटत असतात, तेसुद्धा ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाच्या समर्थनार्थ आहेत. फडणवीस राज्यपालांकडे पाठपुरावा करतील.