ठसा : भालचंद्र कोल्हटकर

>> विकास काटदरे

डोंबिवलीतील नाट्य चळवळीचे आधारस्तंभ अशीच भालचंद्र कोल्हटकर यांची ओळख होती. जुनेजाणते आणि ज्येष्ठ डोंबिवलीकर म्हणूनही ते परिचित होते. शालेय जीवनापासूनच त्यांना नाटकाची आवड होती. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांचा नाट्यक्षेत्रात वावर राहिला. तरुण वयातच त्यांनी गुरुदत्त मंडळाच्या माध्यमातून नाटकांत भूमिका करण्यास सुरुवात केली. डोंबिवलीतील युवा नाट्यकर्मींची संस्था म्हणून या मंडळाचा नावलौकिक होता. या मंडळातर्फे शालेय जीवनापासून व नंतर पोद्दार महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मुंबई साहित्य संघ व सायं मित्र मंडळातर्फे होणार्‍या नाटकांत भूमिका केल्या. विशेष म्हणजे त्यांनी कै. मामा पेंडसे यांच्याबरोबर ‘भाऊबंदकी’मध्ये रामशास्त्री प्रभुणे यांची भूमिका केली. 1966 ते 71 पर्यंत रघुवीरनगर, पाटणकर वाडी येथे झालेल्या नाटकात त्यांनी ‘इथे जन्मली व्यथा’ या नाटकात भूमिका केली व या नाटकास प्रथम पारितोषिक मिळाले होते.

राम गणेश गडकरी यांच्या ‘पुण्यप्रभाव’, ‘राजसंन्यास’ यांसारख्या अनेक दर्जेदार नाटकांत प्रमुख भूमिका केल्या. वास्तविक ते एका खासगी संस्थेत नोकरी करत होते, पण शेवटपर्यंत त्यांनी नोकरी करून नाट्यप्रेम जोपासले. खासगी संस्थेत नोकरी करत असल्याने त्यांनी व्यावसायिक नाटकात जाण्याचे कटाक्षाने टाळले. ‘उठी उठी गोपाळा’ या नृत्यनाटकाला त्यांचा सहभाग होता. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शहरातील विविध नाट्य चळवळींत मोठ्या उत्साहाने भाग घेतला. गुरुदत्त मित्र मंडळाच्या माध्यमातून शहरातील नवोदित कलाकारांना त्यांनी एकत्र आणले. अभिनयासह नाट्य चळवळ रुजवण्याचे काम त्यांनी मोठ्या हौसेने केले. ‘सहलीला सावली आली’, ‘अर्ध्याच्या शोधात दोन’ या प्रायोगिक नाटकांतही त्यांनी अभिनय केला. ‘सहलीला सावली आली’ या नाटकातील त्यांची भूमिका गाजली होती. शहरातील अनेक संस्थांचे मार्गदर्शक, सल्लागार म्हणून कार्यरत होते.

डोंबिवलीत होणार्‍या साहित्य, नाट्य यासारख्या प्रत्येक कार्यक्रमाला ते आवर्जून हजेरी लावत. राज्य नाट्यस्पर्धेची धुराही त्यांनी अनेक वर्षे सांभाळली होती. डोंबिवलीतील श्रीकलासंस्काराचे ते आधारस्तंभ होते. बाल नाट्यविषयक मार्गदर्शन करीत. दूरदर्शनच्या कार्यक्रमात त्यांना बर्‍याच वेळेस आमंत्रित करण्यात येत होते. डोंबिवलीतील नाट्य चळवळीला मरगळ आली म्हणून त्यात जोम आणण्यासाठी काही योजना त्यांच्या मनात होत्या. डोंबिवलीत नाट्य चळवळ रुजावी यासाठी अथक प्रयत्न केले तसेच नवोदित कलाकारांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने डोंबिवलीतील नाट्य चळवळीला मोठा धक्का बसला आहे.