ठसा – विकास काटदरे

618

संघर्ष हेच जीवनाचे सूत्र आणि विनम्रता हाच जगण्याचा भाग हे तत्त्व ज्यांनी आयुष्यभर जपलं ते आदर्श शिक्षक आणि डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार विकास काटदरे यांनी अचानक घेतलेली एक्झिट सार्‍यांनाच चटका लावणारी ठरली आहे. शिक्षकी आणि पत्रकारिता पेशाशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या काटदरे यांना मंगळवारी जणू मृत्यूची चाहूल लागली असावी. प्रकृती साथ देत नाही, आता विश्रांती घ्यावी म्हणतो, असे सूतोवाचही त्यांनी काही सहकार्‍यांकडे  केले, परंतु त्याही दिवशी त्यांनी डोंबिवलीतील बातम्यांचे अपडेट दिले. त्यानंतर अवघ्या दीड तासातच त्यांची प्राणज्योत मालवल्याची  बातमी आली. विकास काटदरे यांच्या निधनाने सुशिक्षित, सुसंस्कृत आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या डोंबिवलीतील माहितीचा एक चालताबोलता संदर्भकोष हरपला आहे.

शालेय जीवनात एनसीसीचे उत्कृष्ट कॅडेट  म्हणून गौरवल्या गेलेल्या काटदरे यांनी तीच शिस्त आपल्या जीवनात अंगिकारली. जगण्याच्या व्यवस्थेचा शोध घेण्यासाठी पंढरपूरहून मुंबईची वाट धरलेल्या काटदरे यांनी परळच्या आर. एम. भट हायस्कूलमध्ये शिक्षकी पेशा स्विकारला. तेथे ते एनसीसी आणि पीटीचे शिक्षक झाले. त्याचबरोबर ते भूगोल हा विषय शिकवत. भूगोलसारखा किंचित दुर्लक्षित असलेला विषय ते  इतक्या  सोप्या आणि रंजक पद्धतीने  शिकवायचे की त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या तासाची वाट पाहत असत. त्यांनी आर. एम. भटचे एनसीसी पथक हे महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट होण्यासाठी परिश्रम घेतले. त्यामुळेच उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा राज्यपातळीवर गौरवही झाला. दिग्दर्शक, अभिनेते केदार शिंदे, नृत्यांगना फुलवा  खामकर, मंदार चांदवडकर यांच्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांच्या तालमीत तयार झाले.

सुरुवातीला परळला आर. एम. भट हायस्कूलजवळ राहणारे काटदरे सर नंतर डोंबिवलीकर झाले. तो काळ हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने भारलेला होता. काटदरे सर शिवसेनाप्रमुखांच्या विचारांच्या प्रेमात पडले आणि शिक्षकी पेशा सांभाळत ते डोंबिवलीकर शिवसैनिकही झाले. शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या काटदरे सरांच्या अंगात पत्रकारितेचे गुण होते. परिपूर्ण आशय, नेमके लिखाण आणि थेट भाष्य करणार्‍या  काटदरे सरांनी त्याकाळी ‘मार्मिक’मधूनही लिखाण केले. त्याकाळी ‘मार्मिक’च्या प्रत्येक अंकात त्यांचे लिखाण हमखास असे. दैनिक ‘सामना’ सुरू झाल्यावर डोंबिवलीच्या वार्तांकनाची जबाबदारी अर्थातच काटदरे सरांकडे आली. आर. एम. भट शाळेत शिकवत असताना डोंबिवलीत काही घडले तर तास संपवून ते तडक डोंबिवली गाठत आणि तिथल्या घडामोडी तातडीने ‘सामना’कडे पाठवत. निवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ पत्रकारितेत झोकून दिले

डोंबिवलीतील पत्रकारांच्या तीन पिढ्यांसोबत त्यांनी काम केले. डोंबिवलीतील कोणत्याही घटनेच्या वृत्तांकनात काटदरे सरांचा सखोल अभ्यास होता. ते स्वत: कट्टर शिवसैनिक असले तरी बातमीदारी करत असताना त्यांनी सर्वपक्षीयांशी ऋणानुबंध जपले. नव्या पिढीतील पत्रकारांसाठी काटदरे सर हक्काचे मार्गदर्शक होते. असंख्य संदर्भांची जणू लायब्ररी असलेल्या काटदरे सरांभोवती तरुण पत्रकारांचा नेहमी गराडा असे. बदलत्या डोंबिवलीचे ते एक डोळस साक्षीदार होते. आपल्यातला शिक्षक जागृत ठेवून त्यांना सतत योग्य ते मार्गदर्शन करत. एखाद्या बातमीची प्रेसनोट त्यांच्याकडे घेऊन येणार्‍या  कार्यकर्त्यालाही  ते प्रेसनोट कशी लिहावी याचेही मार्गदर्शन करत आणि डोळे मिचकावत झुपकेदार मिशांमधून मिश्कीलपणे हसत ‘कळलं का राव’ अशी थापही पाठीवर देत.

काटदरे सरांचा या वयातला उत्साह वाखाणण्याजोगा होता. पोस्टातून फॅक्स कार्डने बातम्या पाठविण्याच्या युगापासून ते ई-मेल आणि व्हॉट्सअ‍ॅप युगापर्यंत झालेले पत्रकारितेतील बदल त्यांनी आत्मसात केले. सर्व तरुण पत्रकारांसोबत ते त्यांच्याहीपेक्षा तरुण होऊन फिरत. पत्रकारितेतील मिशनरी वृत्ती त्यांनी अखेरपर्यंत जपली. डोंबिवलीच्या सच्च्या विकासासाठी त्यांनी आपली लेखणी झिजवली. रोज किमान चार बातम्या देण्याचा शिरस्ता काटदरे सरांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपला. बुधवारी अचानक दोन दिवसांचा सर्दी, ताप आणि शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होऊन काटदरे सरांनी या जगाचा निरोप घेतल्याची चटका लावणारी बातमी आली. काटदरे सरांच्या निधनाने एक प्रामाणिक, संवेदनशील अभ्यासू पत्रकार, आदर्श शिक्षक आणि कडवट शिवसैनिक हरपला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या