जयराम कुलकर्णी – मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता

701

>> मेधा पालकर 

मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणजे जयराम कुलकर्णी. विविध चित्रपटांत त्यांनी साकारलेली वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची भूमिका विशेष ठसा उमटकणारी ठरली. त्यांच्या मराठी चित्रपटांमध्ये अनेक भूमिका गाजल्या. यामध्ये ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’, ‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘भुताचा भाऊ’, ‘दे दणादण’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धुमधडाका’, ‘झपाटलेला’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले.

जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची माकशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे जयराम कुलकर्णी यांचे मूळगाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे 1956 साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली. व्यंकटेश माडगूळकर यांचे सहाय्यक म्हणून जयराम यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे माडगूळकर यांच्या लेखनाशी जयराम यांचा जवळचा संबंध आला. त्यांच्या ‘बनगरवाडी’ या कादंबरीचे वाचन जयराम हे कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचे. कादंबरीतील कोणते पात्र कोणी करायचे यापासून ते सराव आणि ध्वनिमुद्रणापर्यंतचे काम जयरामच पाहत. तात्यांचा म्हणजेच माडगूळकर यांचा सहायक असल्याने कामाच्या निमित्ताने जयराम यांना त्यांच्या घरी अनेकदा जायला लागायचे. प्रभात रस्त्यावरील माडगूळकर यांच्या घरी गेल्यानंतर अनेकदा ग. दि. माडगूळकर यांच्याशी भेट होत असे. त्यातूनच जयराम यांनी ग. दि. माडगूळकर यांचे साहित्य वाचण्यास सुरुकात केली. जयराम यांनी आकाशवाणीसाठी खास ग्रामीण भाषेत केलेले कार्यक्रम श्रोत्यांच्या चांगलेच पसंतीस पडले.

मराठी सिनेदिग्दर्शक अनंतराव माने यांनी जयराम यांना पहिल्यांदा चित्रपटात काम दिले. कोल्हापूर आणि मुंबई येथे चित्रीकरण असल्याने अभिनयाची आवड आणि नोकरी सांभाळताना अनेकदा जयराम यांची तारेवरची कसरत व्हायची. अनेकदा त्यांच्या नोकरीतील रजा संपायच्या. त्यामुळे 1970 च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि ते अभिनय क्षेत्राकडे कळले. आकाशवाणीमुळे त्या वेळचे मोठमोठे कलाकार आणि साहित्यिकांशी जयराम यांची ओळख झाली होती. त्यामुळे चित्रपटात काम करताना पुन्हा एकदा ग्रामीण बोली आणि जयराम या समीकरणानेच प्रत्येक जण त्यांच्याकडे पाहू लागला. सुरुवातीला सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटांतून साकारल्या. परंतु नंतर ‘गंमत जंमत’, ‘दे दणादण’, ‘नवरी मिळे नवर्‍याला’, ‘झपाटलेला’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ अशा अनेक चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका जयराम यांच्या वाट्याला आल्या आणि त्या त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अजरामर केल्या. त्यांच्या निधनाने एक अष्टपैलू कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या