
सामना प्रतिनिधी । पिंपरी
लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या तरुणीकडून सात लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. हिंजवडी येथे ही घटना घडली असून साईनाथ शेट्टी (वय 44) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सप्टेंबर 2017 ते 11 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये घडली. आरोपी शेट्टी यांनी पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत त्याचा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत वेळोवेळी तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून सहा ते सात लाख रुपयांच्या महागड्या वस्तू घेतल्या. गरोदर असतानाही जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिला शिवीगाळ करत मारहाणही केली. कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक व मानसिक छळ केला. दरम्यान, उपनिरीक्षक कविता रूपनर याबाबत अधिक तपास करत आहेत.


























































