>> जुई पालेकर- परळीकर
आपली दोन आयुष्ये असतात. एक, जे आपण दररोज जगतो ते आणि दुसरं, जे आपल्याला दररोज जगावंसं वाटतं ते. ‘ऑक्टोबर जंक्शन’ ही चित्रा आणि सुदीप यांच्या दुसऱया आयुष्याची कहाणी आहे.
दिव्य प्रकाश दुबे हे असे लेखक आहेत, जे त्यांच्या लेखणीच्या जादूने वाचकांना वेगळय़ा जगात घेऊन जाऊ शकतात. त्यांची ‘ऑक्टोबर जंक्शन’ ही कादंबरी वाचताना चित्रा आणि सुदीपबरोबर काही क्षण घालवण्याचा अनुभव अभूतपूर्व आहे. ते वाचकांना अशा प्रेमाची ओळख करून देतात जे व्यक्त होत नाही, तर फक्त हृदयाला जाणवतं. जणू काही न बोलता बरंच काही बोलण्याची भावना कागदावर लेखक उतरवतात. ज्या प्रकारे लेखकाने कथा विणली आहे, ती आगळीवेगळी वाटते.
‘ऑक्टोबर जंक्शन’ ही चित्रा आणि सुदीपची अप्रतिम कहाणी आहे. सुदीप हा यशस्वी उद्योजक आणि चित्रा ही नवोदित लेखिका. सत्य आणि स्वप्न या दोन्हीदरम्यान असलेल्या लहानशा अवकाशात 10 ऑक्टोबर 2010 रोजी चित्रा आणि सुदीप यांची भेट होते आणि पुढची 10 वर्षं ते दोघं दरवर्षी 10 ऑक्टोबरला भेटत राहतात. वर्षातून फक्त एकदा. ‘ऑक्टोबर जंक्शन’मधील दहा दिवस म्हणजे 10 ऑक्टोबर 2010 ते 10 ऑक्टोबर 2020 या दहा वर्षांची कथा आहे. ते प्रियकर-प्रेयसी नाहीत किंवा मित्रही नाहीत; परंतु त्यांच्यामध्ये अतूट असे शाश्वत प्रेमाचं न दिसणारं एक बंधन आहे, जे त्या दोघांसाठी खरोखरच अनमोल आहे.
‘ऑक्टोबर जंक्शन’ ही त्या 10 वर्षांतील प्रत्येक 10 ऑक्टोबरच्या बैठकीची कहाणी आहे. चित्राला भेटणं आणि तिच्याशी बोलणं सुदीपला आवडतं. कारण ज्या प्रकारे तिला त्याचं मौन समजतं त्या मार्गाने अन्य कोणीही समजून घेऊ शकत नाही. या गोष्टीत एकीकडे आहे सुदीप, ज्याने बारावीनंतर शिक्षण व घर दोन्ही सोडून दिलं आणि तो मिलेनियर बनला; तर दुसरीकडे आहे चित्रा, जी तिने लिहिलेल्या पुस्तकांच्या लोकप्रियतेमुळे आजकाल प्रत्येक लिटरेचर फेस्टिव्हलचा केंद्रबिंदू ठरतेय. दर रविवारच्या वर्तमानपत्रात तिचा लेख प्रसिद्ध होतो आणि पुढचा लेख प्रसिद्ध होईपर्यंत त्या लेखाविषयी सोशल मीडियावर चर्चांचे फडही रंगतात. खरंतर आपल्या आयुष्यातील एक दिवस कोणासाठी तरी बाजूला ठेवणं, आपल्या जीवनातून काढून दुसऱया एखाद्याला देणं ही कल्पनाच अनोखी आहे आणि त्याहूनही सुंदर आहे ते आपला अपूर्ण भाग असलेल्या अशा व्यक्तीचा शोध घेणं, जिच्यासह आपण जग विसरू शकतो, जिच्याजवळ हसू आणि रडू शकतो. अशी व्यक्ती जिच्याबरोबर असण्यानेच मनाला विश्रांती मिळते.
असून नसलेल्या आणि नसून असलेल्या शाश्वत प्रेमाचा एक धागा म्हणजे ‘ऑक्टोबर जंक्शन’ असं म्हणता येऊ शकतं. जीवनातील काही बारीकसारीक गोष्टी अधोरेखित करणारं हे पुस्तक प्रेमाचं नवं रूप धारण करतं. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक बनारसची सुंदर सहल घडवतो आणि गंगेच्या काठावरील या शहरात नाती समजून घेण्यास परिपक्व करतो. या पुस्तकाच्या रूपाने एक नवीन शैली आणि नवीन दृष्टिकोन प्रत्यक्षात आला आहे. भाषा सोपी आणि अत्यंत साध्या शब्दांच्या वापरासह वाचकांसाठी सुलभ आहे. ‘ऑक्टोबर जंक्शन’ वाचताना आपण वाचकही त्याच रस्त्यांमधून, त्याच सत्यांमधून, त्याच चुकांमधून अगदी तसेच जाल…जशी या गोष्टीतली पात्रं गेली आहेत. अनुवादक विलास गीते यांनी हिंदीतील शब्दांची सहजता मराठीत यशस्वीरीत्या आणली आहे.