
ओडिशात एक आगळंवेगळं प्रकरण समोर आलं आहे. येथे नवरा मुलगा वरात घेऊन आला नाही, म्हणून नवरी चक्क नवरदेवाच्या घरासमोर आंदोलनाला बसल्याचा प्रकार घडला आहे. नवरी मुलीचा आरोप आहे की, अनेक तास वाट पाहूनही वरात आली नाही. त्यानंतर वधूने आणि तिच्या कुटुंबीयांनी नवऱ्या मुलाला अनेक फोन, मेसेज केले. मात्र त्याने फोन किंवा मेसेजचे कोणतेही उत्तर दिले नाही. अनेक तास वाट पाहिल्यानंतर नवरी थेट लग्न मंडपातून निघून आपल्या आईसोबत नवऱ्या मुलाच्या घराबाहेर पोहोचली व आंदोलनाला बसली.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ओडिशामधील बरहमपुर येथील आहे. नवरी मुलीचे म्हणणे आहे की, तिने 7 सप्टेंबर 2020 रोजी सुमितशी (नवरा मुलगा) नोंदणी विवाह केला होता. त्यांनी कुटुंबीयांची परवानगी न घेता विवाह केला होता. त्यानंतर पहिल्या दिवसापासून सुमितचे घरातले महिलेला त्रास देत होते, असं या महिलेचे म्हणणे आहे. या महिलेला अनेकवेळा सुमितच्या कुटुंबीयांनी त्रास देऊन खोलीत बंद देखील केले होते. त्यानंतर महिलेने याविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली होती. मात्र नंतर सुमित आणि या महिलेच्या कुटुंबीयांनी एकत्र येत हे प्रकरण मिटवले आणि हिंदू प्रथेप्रमाणे या दोघांचा पुन्हा विवाह करण्याचे ठरवले.
या दोघांची 22 नोव्हेंबरला लग्नाची तारीख ठरली होती. मात्र नवरा मुलगा आणि त्याचे कुटुंबीय वरात घेऊन नवरी मुलीच्या घरी आलेच नाही. ज्यामुळे नवरी मुलगी सुमितच्या घराबाहेर आंदोलनाला बसली. या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली असता ते घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नवरी मुलगी आणि तिच्या आईला समजावण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवरी मुलीने पोलिसांवर सुमित आणि त्यांच्या कुटुंबियांकडून लाच घेतल्याचा आरोप केला. याप्रकरणी बोलताना स्थानिक पोलीस अधिकारी पिनाक मिश्रा यांनी सांगितलं की, याप्रकरणी आधीही महिलेने पोलिसात तक्रार नोंदवली आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाईल.




























































