
आंतरजातीय विवाह केल्याने एका 22 वर्षीय आदिवासी तरुणाला पंचायतीने 90 हजार रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय भरचौकात तरुणाचे मुंडन करून संपूर्ण समाजाला मांसाहारी जेवण देण्यास भाग पाडले. ओडिशामधील कोरापुट जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे.
जयेपूर येथील कुंभार साही येथील माळी समाजाचा महेश्वर खिला याचे राणा समाजातील उर्मिला खाडा या तरुणीशी प्रेमसंबंध होते. दोघांची जात वेगळी असल्याने कुटुंबियांचा आणि समाजाचा त्यांच्या लग्नाला तीव्र विरोध होता. यामुळे दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केले. यानंतर काही दिवस दोघेही समजापासून दूर राहिले.
काही दिवसांनी गावात परतल्यानंतर माळी समाजाने यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली. या बैठकीत जर महेश्वरला त्याच्या पत्नीला घरात प्रवेश द्यायचा असेल, तर त्याला सामाजिक किंमत चुकवावी लागेल, असा निर्णय समाजातील ज्येष्ठ सदस्यांनी दिला.
या शिक्षेनुसार महेश्वरला 90 हजार रुपये रोख दंड आणि भरचौकात सर्वांसमोर स्वतःचे मुंडण करावे लागले. तसेच संपूर्ण समाजासाठी मटण आणि भात जेवणावळीचा खर्च करावा लागला, असे ठरले. त्यानुसार महेश्वरच्या शेतकरी वडिलांनी 90 हजार रुपये पंचायतीत भरले. त्यानंतर मुंडण आणि जेवणावळीचा कार्यक्रम पार पडला. ही घटना उघडकीस येताच सर्वत्र एकच खळबळ उडाली. अशा प्रकारे सामाजिक बहिष्काराची भीती दाखवून गरिबांची आर्थिक लूट आणि मानहानी केली जात असल्याबद्दल संताप व्यक्त होत आहे.




























































