
केंद्र सरकारने नाशिकजवळील ओझर विमानतळाला ’इंटरनॅशनल कुरीयर हब’ची मान्यता दिली आहे. येत्या सहा महिन्यात येथून आंतरराष्ट्रीय हवाई कुरीयर सेवा सुरू होईल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
गेल्या काही वर्षांपासून खासदार हेमंत गोडसे नाशिकला इंटरनॅशनल कुरीयर हब मिळावे म्हणून प्रयत्नशील होते. नुकतेच या मान्यतेचे पत्र केंद्राकडून प्राप्त झाले आहे. देशात केवळ 13 विमानतळांवर ही सेवा उपलब्ध होती. आंतरराष्ट्रीय कुरीयर सेवेसाठी नाशिकच्या नागरिकांना मुंबई गाठावी लागत होती. आता या हबमुळे नाशिक, बडोदा, वापी, बलसाडसह अन्य राज्यातील कुरीयर ओझर विमानतळावरून जाण्यास सुरुवात होईल. यामुळे नाशिक जिह्याच्या विकासात भर पडणार आहे, असे खासदार गोडसे यांनी सांगितले. राज्यातील दुसर्या क्रमांकाचे कुरीयर हब नाशिकला साकारले जाईल. दररोज एका विमानाने ही सेवा देण्यात येईल. त्याची क्षमता दहा टन इतकी असेल, अशी माहितीही त्यांनी दिली.

































































