कर्मचारी 950; थकबाकी वसुलीचे टार्गेट 800 कोटींचे! सोलापूर जिल्हा बँकेतील स्थिती

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने गरजेला कर्जरूपाने अर्थसाहाय्य करूनही 23 हजार 199 शेतकऱयांनी अद्यापि कर्जाची वेळेत परतफेड केलेली नाही. त्यांच्यासाठी एकरकमी परतफेड योजना सुरू केली असून, त्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. तरीही बँकेसमोर 800 कोटींची थकबाकी असून, बँकेच्या 207 शाखांमध्ये 950 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे आता बँकेने प्रत्येक कर्मचाऱयाला 50 लाखांच्या वसुलीचे टार्गेट दिले आहे.

दरवर्षी सोलापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून रब्बी व खरीप हंगामांत जवळपास 90 हजार शेतकऱयांना एक हजार कोटींच्या पीककर्जाचे वाटप केले जाते. यंदा 80 टक्क्यांपर्यंत बँकेने कर्जवाटप केले आहे. 30 जूनपर्यंत शेतकऱयांकडे बँकेची अल्प, मध्यम व दीर्घ मुदतीची तब्बल 745 कोटी 71 लाखांची थकबाकी आहे. त्याची वसुली सुरू असतानाच आता जुन्या थकबाकीदारांमुळे बँकेची डोकेदुखी वाढली आहे.

सोलापूर जिल्हा बँकेवर प्रशासकराज येऊन आता दोन वर्षांचा कालावधी उलटला तरीही थकबाकीची अपेक्षित वसुली झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता बँकेतील शिपायापासून शाखा अधिकाऱयांपर्यंत प्रत्येकाला त्यांच्या गावातील, परिसरातील पाच थकबाकीदारांकडील कर्जाच्या वसुलीचे टार्गेट देण्यात आले आहे. तरीदेखील आतापर्यंत ‘ओटीएस’मधून 23 हजार 199पैकी 518 शेतकऱयांनीच कर्जाची थकबाकी भरली आहे. उर्वरित थकबाकीदार शेतकऱयांना 30 सप्टेंबरपर्यंत थकबाकी भरण्याचे आवाहन बँकेने केले आहे. सोलापूर जिल्हा बँकेच्या 207 शाखा असून, त्यात 950 कर्मचारी कार्यरत आहेत. बँकेच्या चार हजार कोटींपर्यंत ठेवी आहेत. मार्च 2024पर्यंत एकूण ठेवी सहा हजार कोटींपर्यंत होतील, असे प्रशासक कुंदन भोळे यांनी सांगितले.