मोनोरेलला बिघाडाचे ग्रहण, जुन्या गाड्यांमुळे फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले; प्रवाशांना मनस्ताप

mumbai-monorail-001

दक्षिण मुंबईतील संत गाडगे महाराज चौक ते पूर्व उपनगरातील चेंबूरला जोडणाऱया मोनोरेलच्या सेवेला सध्या बिघाडाचे ग्रहण लागले आहे. मोनोरेलच्या गाडय़ा जुन्या झाल्या आहेत. त्यात वारंवार बिघाड होत आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांत मोनोरेलच्या फेऱया रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून त्याचा मोठा मनस्ताप नियमित प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

मुंबईत 2 फेब्रुवारी 2014 रोजी मोनोरेलची सेवा सुरू झाली होती. या दिवशी चेंबूर ते वडाळा या पहिल्या टप्प्यातील मार्गावर मोनोरेल प्रवासी सेवेत दाखल झाली होती. त्यानंतर दुसऱया टप्प्यात 17 स्थानकांची संपूर्ण मार्गिका 4 मार्च 2019 रोजी मुंबईकरांसाठी खुली करण्यात आली. मात्र मागील 11 वर्षांत मोनोरेलला प्रवाशांचा तितकासा प्रतिसाद मिळालेला नाही. अपेक्षित महसूल मिळत नसल्याने सरकार आणि एमएमआरडीएचे मोनोरेलच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. या मार्गिकेवर धावणाऱया गाडय़ा जुन्या झाल्या असून त्यात वारंवार बिघाड निर्माण होत आहे. त्यामुळे मोनोरेलच्या फेऱया रद्द होण्याचे प्रमाण वाढल्याने नियमित प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे.

प्रवाशांच्या तक्रारींवर प्रशासन ढिम्मच

मोनोरेलचे व्यवस्थापन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) सांभाळले जात आहे. मोनोरेलच्या सेवेत नवीन गाडय़ा दाखल करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तांत्रिक बिघाडामुळे वारंवार गाडय़ा रद्द केल्या जातात. परिणामी, मागून येणाऱया दुसऱया गाडीला गर्दी होते. याबाबतच्या तक्रारींची दखल एमएमआरडीए घेत नसल्याचे प्रवासी सांगतात.