कोरोनाचा धसका, आता पॅरिस ऑलिम्पिकच्या बजेटलाही ‘कात्री’,

307

कोरोनाचा धसका आता ‘पॅरिस ऑलिम्पिक’(2024) आयोजकांनीही घेतला आहे. या वर्षी होणारे ‘टोकियो ऑलिम्पिक’ आता पुढल्या वर्षी आयोजित करण्यात येणार आहे. कोरोनावर अद्यापि लस आलेली नाही. त्यामुळे 2021 सालात होणार्‍या ऑलिम्पिक आयोजनावरही प्रश्नचिन्ह आहे. कारण ऑलिम्पिकच्या तयारीवर जपानने आधीच कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. या पार्श्वभूमीवर पॅरिस आयोजकांकडून कसे बजेट ठरविण्यात येईल, यावर सर्वांच्या नजरा असतील.

पॅरिसमध्ये 1924 सालामध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले होते. आता 2024 सालामध्ये पुन्हा एकदा पॅरिसमध्ये जगातील प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी 6.8 बिलियन युरो इतका खर्च करण्यात येणार होता. मात्र, आता जादा खर्च होणार नाही, याकडे आयोजक गांभीर्याने लक्ष देत आहेत.

आता खेळाडूंसाठी फक्त 15 हजार बेड

पॅरिसमधील क्रीडागाकात खेळाडूंसाठी सुविधा करण्यात येणार आहेत. याआधी जगभरातील खेळाडूंसाठी 18 हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार होती; पण आता यामध्येही ‘कात्री’ लावण्यात येणार आहे. आता फक्त 15 हजार ऍथलिट्ससाठीच बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

खेळ व खेळाडूंनाही बसू शकतो धक्का

सध्या ऑलिम्पिकसाठी 10,500 खेळाडूंना पात्र होता येते. मात्र, या स्पर्धेचे बजेट कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती व आयोजकांकडून काही खेळ कमी करून त्यामधील खेळाडूंनाही बाहेर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येऊ शकतात. त्यामुळे काही खेळ व खेळाडूंना याचा धक्का बसल्यास आश्चर्य वाटायला नको.

आपली प्रतिक्रिया द्या