ऑलिम्पिकपात्र खेळाडूंना मिळाला लसीचा पहिला डोस, 17 ऑलिम्पियन खेळाडूंना लसीचे दोन्ही डोस पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील खेळाडूंच्या लसीकरणाला आता वेग आला आहे. सर्वप्रकारच्या खेळातील 148 खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळाला असून, यात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंचा अधिक भरणा आहे. 148 पैकी 17 खेळाडूंचे तर लसीचे दोन्ही डोस पूर्ण झालेले आहे.

हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरींदर बत्रा यांनी ही माहिती दिली. पॅरा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या हिंदुस्थानच्या 12 खेळाडूंना लसीचा पहिला डोस मिळाला असून, इतर दोन खेळाडूंना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. विशेष खेळाडूंची संख्या धरल्यास 20 मेपर्यंत एकूण 163 खेळाडूंना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
लसीकरणाबद्दल माहिती देताना नरींदर बत्रा म्हणाले, खेळाडूंशिवाय 87 पदाधिकाऱयांनाही लसीचा पहिला डोस देण्यात आला असून, यातील 23 जणांचे तर दोन्ही डोस झाले आहेत.

नेमबाजांना मिळणार क्रोएशियात लस

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले हिंदुस्थानी नेमबाज सध्या क्रोएशियात सराव करीत आहेत. तेथूनच ते टोकियो ऑलिम्पिकसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे या नेमबाजांना क्रोएशियामध्येच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार असल्याची माहिती हिंदुस्थानी रायफल संघटनेने दिली आहे. यातील काही नेमबाजांनी क्रोएशियाला रवाना होण्यापूर्वी मायदेशातच पहिला डोस घेतला आहे. त्यामुळे अर्थातच त्यांना क्रोएशियात दुसरा डोस देण्यात येणार आहे.

भवानी देवी, मीराबाई चानूचेही लसीकरण

तलवारबाजीमध्ये प्रथमच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली भवानी देवी सध्या इटलीत सराव करीत असून, तिनेही तिकडेच लसीचा पहिला डोस घेतला आहे. याचबरोबर वेटलिफ्टर खेळाडू मीराबाई चानू ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत सराव करीत असून, तिचेदेखील तिकडेच लसीकरण होणार आहे.