
ऑलिम्पिक नुकतेच पार पडले. कोरोनाच्या काळातही जपानकडून या क्रीडा महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. आता 2024 सालातील पॅरीस ऑलिम्पिकचे वेध लागले. याचप्रसंगी क्रिकेट या खेळाच्या ऑलिम्पिकमधील सहभागाच्या मोहिमेने वेग पकडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) यासाठी प्रयत्न करीत आहे. 2028 सालात अमेरिकेतील लॉस एंजिलीसमध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट या खेळाचा समावेश व्हावा यासाठी आयसीसीकडून वर्पिंग कमिटीची स्थापनाही करण्यात आली आहे.
दक्षिण आशिया, अमेरिकेत क्रिकेटप्रेमींची झुंबड
आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्पले या वेळी म्हणाले की, क्रिकेट या खेळाचा चाहता वर्ग मोठा आहे. या खेळाचे दक्षिण आशियामधून 92 टक्के चाहते आहेत. तसेच 30 दशलक्ष चाहते हे अमेरिकेतील आहेत. अशा क्रिकेटवेडय़ा चाहत्यांसाठी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होणे ही पर्वणीच ठरणार आहे, असेही ग्रेग बार्पले पुढे म्हणाले.
राष्ट्रकुलमध्ये पुढल्या वर्षी या खेळाचा समावेश
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 सालात बर्मिंगहॅम येथे होणार आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेट या खेळाचाही समावेश करण्यात आला आहे. यात महिला क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. 1998 सालानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे.
2024मध्ये अंतिम निर्णय होईल
लॉस एंजिलीस ऑलिम्पिक 2028मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये कोणत्या नव्या खेळांचा समावेश करण्यात यावा याबाबतचा अंतिम निर्णय 2024 सालात घेण्यात येणार आहे. याप्रसंगी ग्रेग बार्पले म्हणाले, क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण क्रिकेटशिवाय इतरही खेळ ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करण्यासाठी आतूर असतील. त्यामुळे क्रिकेटचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नसेल, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.
कमिटीतील सदस्य
- इयान व्हॉटमोर (इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्ड)
- इंद्रा नुयी (आयसीसी)
- तवेंग्वा मुकुहलानी (झिम्बाब्वे क्रिकेट)
- महिंदा वल्लीपुरम (आशियाई क्रिकेट काउन्सिल)
- पराग मराठे (यूएसए क्रिकेट)



























































