कर्जतच्या लोभेवाडीत ओम फट् स्वाहा; मुख्य रस्त्यावर लिंबू, मिरची, गुलाल, भाज्या

black-magic

कर्जत तालुक्यातील दुर्गम लोभेवाडी गावात वर्षभरात दुसऱ्यांदा ओम फट् स्वाहाचा प्रकार घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. गावाच्या मुख्य रस्त्यावर अज्ञात भगताने मध्यरात्रीच्या सुमारास मिरची, लिंबू, गुलाल, जिरा, मोहरी, भाज्या यासारख्या वस्तू टाकून त्यावर पिळदार लोखंडी पट्टी ठेवली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांची एकच पळापळ झाली. दरम्यान हा प्रकार गावावर करणी करण्यासाठी करण्यात आल्याची अफवा पसरल्यामुळे वातावरण तणावग्रस्त बनले आहे.

कर्जत तालुक्यात नुकताच स्मशानभूमीत पैशांचा पाऊस पाडण्याचा प्रकार कर्जत पोलिसांनी उघडकीस आणला होता. त्यानंतर लोभेवाडी वेशीवर अज्ञातांनी अशाच प्रकारे ‘देवदेवस्की’ केली होती. दोन दिवसांपूर्वी याच गावात एका महिलेच्या घराच्या भिंतीवर गुलाल लावून लिंबू ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता एका मुख्य रस्त्यावर हा उतारा टाकण्यात आला आहे. एकापाठोपाठ एक घडलेल्या या प्रकारामुळे लोभेवाडीतील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. हा खोडसाळपणा करणाऱ्या समाजकंटकाला पकडून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या उताऱ्यामुळे गावात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्याने महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अंधश्रध्दा निर्मूलनाचे पथक गावात दाखल
गावावर करणी केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर कर्जत अंधश्रद्धा निर्मूलन समिती लोभेवाडीत दाखल झाली. जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोऱ्हाडे, सदस्य आकाश कांबळे व अभिजित बोऱ्हाडे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांना अशा प्रकारच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले. जादूटोणा, करणी, नरबळी या गोष्टी भंपक असून त्याला बळी पडू नका, हा प्रकार फक्त घाबरवण्यासाठी करण्यात आला आहे. त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करा, असेही ते यावेळी म्हणाले.