‘मी थांबणार नाही’ म्हणत जम्मू कश्मिरच्या मुख्यमंत्र्यांनी भिंतीवरुन उडी मारून फातिहा वाचला, ‘शहीद दिवसा’वरून जम्मू-कश्मिरमध्ये तणाव  

जम्मू कश्मिरमधील शहीद दिवसावरचा वाद सध्या चांगलाच चिघळला आहे. प्रशासनाने अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवले होते. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी मजार-ए-शुहादाच्या भिंतीवरून उडी मारून फातिहा वाचला. ओमर अब्दुल्ला यांना फातिहा अदा करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप केला आहे. परंतु याही परिस्थितीमध्ये त्यांनी ख्वाजा बाजार, नवहट्टा येथे जाऊन मजार-ए-शुहादाच्या भिंतीवरून उडी मारून फातिहा अदा करण्यासाठी गेले होते. यादरम्यान पोलिसांसोबत त्यांची झटापट झाली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलेल्या आरोपानुसार, पोलिसांकडून त्यांचा शारीरिक छळ करण्यात आला होता. व्हिडिओ शेअर करताना ओमर लिहितात की, ते 13 जुलै शहीदांच्या कबरींवर गेले आणि फातिहा वाचला. दर्ग्याचा दरवाजा बंद केला आणि मला भिंतीवरून उडी मारण्यास भाग पाडले. त्यांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला, पण आज मी थांबणार नव्हतो.

यावर अधिक बोलताना अब्दुल्ला म्हणाले की, ही खूप खेदाची बाब आहे की जे लोक स्वतः दावा करतात की त्यांची जबाबदारी फक्त सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्था आहे. परंतु त्यांनी आम्हाला येथे येऊन फातिहा वाचू दिले नाही. सर्वांना नजरकैदेत ठेवण्यात आले. जेव्हा दरवाजे उघडायला सुरुवात झाली तेव्हाही मी नियंत्रण कक्षाला सांगितले की, मला इथे यायचे आहे. त्यानंतर काही मिनिटांतच माझ्या दरवाज्याबाहेर एक बंकर ठेवण्यात आला. रात्री 12-1 वाजेपर्यंत तो हटवण्यात आला नाही.

जम्मू आणि काश्मीरमध्ये 13 जुलै हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला होता.