
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे व्हॉट्सअॅप अकाऊंट हे गेल्या चार पाच दिवसांपासून ब्लॉक आहे. या प्रकरणी ओमराजे यांनी पोलिसांत व सायबर सेलकडे देखील तक्रार केली आहे. मात्र अद्याप त्यांचे अकाऊंट रिकव्हर झालेले नाही. ” व्हॉट्सअॅप अकाऊंट ब्लॉक करणे ही विरोधकांची खेळी असून आपल्याला सामन्य जनतेची मदत करण्यापासून रोखण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार घडवून आणला आहे”, असा आरोप ओमराजे यांनी केला आहे.
”मागच्या चार दिवसांपासून माझं व्हॉट्सअॅपचं अकाऊंट ब्लॉक आहे. माझ्या व्हॉट्सअॅपवर मला शेतकऱ्यांचे, विद्यार्थ्यांचे, अडचणीत असलेल्या व्यक्तींची अनेक निवेदनं येत असतात. मात्र आता व्हॉट्सअॅप ब्लॉक असल्याने सर्व सामान्यांची कामे रखडली आहेत. काही राजकीय विरोधकांनी त्यांची सोशल मीडियाची टीम तयार करून माझ्या व्हॉट्सअॅप नंबरवर रिपोर्ट मारले आहेत. त्यामुळे माझं अकाऊंट ब्लॉक झालं आहे. मला सर्व सामान्य लोकांना मदत करण्यापासून कसं रोखता येईल यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. मी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे. लोकांना पगार देऊन यासाठी कामावर ठेवण्यात आलं आहे, त्यांच्याकडून . जनतेला लुबाडून कमावलेला पैशाचा माज दाखवत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे”, असे ओमराजे यांनी सांगितले.