पारनेरमध्ये सव्वा कोटीची विदेशी दारू कंटेनरमधून जप्त, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे आणि नगर येथील भरारी पथकांनी संयुक्तपणे कारवाई करून 1 कोटी 21 लाख 50 हजार 500 रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील पळवे शिवारात उभ्या असलेल्या मालवाहू कंटेनरमधून दारूची 1 हजार 500 खोकी जप्त करण्यात आली. याप्रकरणी कंटेनरसह चालकाला अटक करण्यात आली असून, आणखी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

प्रदीप परमेश्वर पवार (रा. तांबाळी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे कंटेनरचालकाचे नाव आहे. बापू भोसले (खवनी, ता. मोहोळ), निखिल कोकाटे (तांबोळी, ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची
नावे आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील अधीक्षक, नारायणगाव व तळेगाव दाभाडे (पुणे) येथील दुय्यम निरीक्षक तसेच नगरच्या भरारी पथकाला या बेकायदेशीर दारू वाहतुकीची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पळवे शिवारात ही कारवाई करण्यात आली. ‘दारूच्या खोक्यांनी भरलेला कंटेनर आपण गोवा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर ताब्यात घेतला. कंटेनर नाशिक येथील टोलनाक्यापर्यंत नेण्याची जबाबदारी आपणावर होती, अशी माहिती कंटेनरचालक प्रदीप पवार याने चौकशीदरम्यान दिली आहे.

परराज्यातील विदेशी दारूची बेकायदेशीरपणे वाहतूक केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या प्रदीप पवार याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुह्यात बापू भोसले व निखिल कोकाटे यांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या नगर येथील भरारी पथकाचे निरीक्षक ओ. बी. बनकर पुढील तपास करीत आहेत.