एसटी महामंडळाच्या अपहारप्रकरणी एकाला अटक

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या लिपिकाने पदाचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. 21 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी एकाला नागपाडा पोलिसांनी अटक केली. युझर आयडी आणि पासवर्डचा गैरवापर करून महामंडळाची रक्कम त्याने वळती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

तक्रारदार हे एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात लेखाधिकारी म्हणून काम करत होते. त्या कार्यालयातून लेखापरीक्षण करून नोंदणी आणि अंदाज या खात्याचे आयकर भरण्याचे काम केले जाते. त्यासाठी एसटी महामंडळाचे खाते असलेल्या बँकेत रक्कम भरली जाते. नागपाडा पोलिसांनी अटक केलेला तो लिपिक म्हणून काम करत होता. ठेकेदारांची बिल बनवून पुढे पाठविणे, आयकराचे काम पाहण्याची जबाबदारी त्याची होती.

गेल्या वर्षी जूनपासून त्याने कामावर येणे बंद केले. कामावर येत नसल्याने त्याचे युझर आयडी आणि ओटीपीची गरज असल्याने एका कर्मचाऱ्याने त्याला संपर्क साधला. त्याचा फोन बंद होता. त्यानंतर तक्रारदाराने युझर आयडी बदलून ऑनलाइन व्यवहाराची माहिती घेतली. तेव्हा 21 लाख 80 हजार रुपये विविध खात्यांत वर्ग झाल्याचे दिसले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तक्रारदाराने चौकशी केली. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार त्याने नागपाडा तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी एकाला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.