
लॉकडाऊन आणि जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही मिळेल त्या वाहनाने मुंबईहून कोल्हापूरातील कनान नगर झोपडपट्टीत दाखल झालेल्या तरुणाचा गुरुवारी कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आला. त्यामुळे रातोरात ही संपूर्ण झोपडपट्टी प्रशासनाकडून सीलबंद करण्यात आली. संबंधित कोरोनाबाधित तरुणाच्या संपर्कात आल्याने त्याच्या कुटुंबियांचे नमुने तपासणीसाठी रात्रीच पाठविण्यात आले.
मुंबईहुन रत्नागिरी आणि कोल्हापूरमार्गे आंध्रप्रदेशकडे अवैधरीत्या प्रवास करणाऱ्या तरुणाला कोल्हापूर पोलिसांनी पकडून छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात दाखल केले. गुरुवारी सकाळी त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. तर मुंबईहून बुधवारी कनाननगर झोपडपट्टीत घरी परतलेल्या तरुणाचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात एकाच दिवशी दोन कोरोना रुग्ण आढळले. त्यात एक तरुण स्थानिक कनाननगर झोपडपट्टीतील असल्याने कोल्हापूरकरांसह जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले होते. रात्री या झोपडपट्टीसह आसपासचा पाचशे मीटरचा परिसर प्रशासनाकडून सीलबंद करण्यात आला. तर संबंधित तरुणाच्या कुटुंबियातील सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून सर्वांना सीपीआरमध्ये कोरोना वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. तर शेजारच्या नागरिकांचीही सीपीआर येथे माहिती घेऊन मध्यरात्री घरी सोडण्यात आले.
प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
मिळेल त्या वाहनाने मुंबईहून आलेला हा तरुण बुधवारी सकाळी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल परिसरातून चालत घरी आला होता. ताप आल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल करण्यावरुन कुटुंबियाशी त्यांचा वाद झाला. कुटुंबियांनी त्याला सीपीआरमध्ये दाखल केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्याने कोल्हापूरकरांची चिंता अधिक वाढली आहे.
झोपडपट्टी झाली हवालदिल
कनानगर झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्याने संपूर्ण कनाननगर सीलबंद करण्यात आला आहे. शहरातील सर्वांत मोठ्या झोपडपट्टीत राहणारे बहुतांश सर्वजण मोलमजुरी करणारे,धुणी-भांडी करणारे आहेत. अगोदरच लॉकडाऊन आणि संचारबंदीला दिड महिना होत आला. त्यामुळे रोजगार बुडाला असतानाच येथे कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे अनेक घरात धुणी-भांडी करणाऱ्या तसेच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या मालकाने कामावर येण्यास मनाई केली आहे. त्यामुळे या झोपडपट्टीतील हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.





























































