रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाची मुस्कटदाबी, सवा कोटींचा धनादेशच दाबला… दीड वर्षानंतर केबिनच्या दाराला टांगला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा परिषदेत कर्मचाऱयांच्या हलगर्जीपणाचा कहर पाहायला मिळाला आहे. दीड वर्षापूर्वीचा सवा कोटी रुपयांचा विकासकामांचा धनादेशच दाबून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दीड वर्षापूर्वीच्या गायब झालेल्या चेकला अचानक पाय फुटले आणि हा धनादेश मुख्य लेखाधिकाऱयांच्या दालनाच्या दरवाजाला लटकलेला आढळला. 

सुरुवातीला धनादेश गायब करायचा आणि बोंबाबोंब झाल्यावर तोच धनादेश दालनाच्या दरवाजाला अडकवण्याचा प्रताप जिल्हा परिषदेत घडला आहे. हा धनादेश कोणी अडकवून ठेवला याचा शोध सुरू आहे. इतक्या मोठय़ा निधीचा धनादेश गायब होणे आणि मग तो दरवाजाला लटकलेला सापडणे या प्रकारामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे.

तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सरोवर संवर्धनासाठी निधी मंजूर केला होता. त्यातून खेड तालुक्यातील सवेणी आणि घेरा पालगड या दोन तलावांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण होणार होते. सवेणीसाठी 1 कोटी 25 लाख आणि घेरा पालगडसाठी 12 लाख 82 हजार रुपये मंजूर झाले. हे धनादेश खेड पंचायत समितीकडून जून 2019 ला रत्नागिरी जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले.

हा धनादेश सामान्य प्रशासनाकडे गेला होता. मात्र त्यानंतर सवा कोटी रुपयांच्या धनादेशाने कोठे उड्डाण घेतले हा संशोधनाचा विषय ठरला आहे. धनादेश गायब होण्याची माहिती उघड होताच अनेकांचे धाबे दणाणले. सुरुवातीला धनादेश गायब झाला असे चित्र निर्माण झाले असले तरी हरवलेला धनादेश पुन्हा येतो कसा ही घटनाही अनेकांना आश्चर्यचकित करणारी आहे.

धनादेश पुणी दाराला लटकवला हे सीसीटीव्हीच सांगेल!

हा धनादेश गायब झाला नसून दाबला गेल्याची जिल्ह्याच्या विकासाचीच मुस्कटदाबी केल्याची चर्चा आहे. अचानक दीड वर्ष गायब असलेला धनादेश मारुतीने संजीवनी आणावी तसा अचानक दरवाजाच्या कडीला लटकताना कसा दिसतो.

दीड वर्षानंतर या धनादेशाची वैधताही संपली होती. तरीही हा चेक दारावर कोण लावून गेला हे जिल्हा परिषदेतील सीसीटीव्हीच सांगू शकतात. सीसीटीव्ही तपासले गेल्यास धनादेशाला दरवाजापर्यंत पोहोचवणारे महाशय सापडू शकतात. तसेच धनादेश आल्यापासून त्याच्या आवक नोंदी आणि पुढील कार्यवाही तपासल्यास हा हलगर्जीपणा कोणाचा आहे हेही आढळून येऊ शकते.  

बेजबाबदार अधिकाऱयावर कारवाई करा – अरुण कदम

जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम यांनी या कर्मचाऱयांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केला आहे. 2019ला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धनादेश गायब होण्यामागे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा धनादेश गायब करणारा आणि लपवलेला धनादेश पुन्हा आणणाऱयांची पाळेमुळे आम्ही खणून काढणार. हा धनादेश ताब्यात घेतल्यापासून दीड वर्षानंतर हा धनादेश पुन्हा आणून दाराला लटकवून ठेवणाऱयाला आम्ही शोधून काढू, असे अरुण कदम यांनी सांगितले. शिवसेनेचे दापोलीचे आमदार योगेश कदम यांनीही या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे.