शिवसेनेच्या प्रयत्नाने शेवाळा जि.प. गटात 1 कोटी 31 लाखांची कामे मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंगोलीतील कळमनुरी तालुक्यातील शेवाळा जिल्हा परिषद गटातील सात गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या जनसुविधा योजनेंतर्गत विकासकामांसाठी 1 कोटी 31 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक बसविणे, विद्युतीकरण, नाली बांधकाम, शादीखाना, सभागृह बांधकाम आदी कामे केली जाणार आहेत. शिवसेनेच्या जिल्हा परिषद अध्यक्षा शिवराणी प्रकाश नरवाडे व कळमनुरी पंचायत समितीचे उपसभापती अजय सावंत उर्फ गोपु पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला आहे.

शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या माध्यमातून ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याकडे शिवसेनेचे पंचायत समिती उपसभापती अजय सावंत यांनी जनसुविधा योजना अर्थात 25-15 च्या अंतर्गत निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन व केलेल्या पाठपुराव्यानुसार एक कोटी 31 लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत. यामध्ये शेवाळा येथे शादीखाना सभागृहाच्या बांधकामासाठी 20 लाख, देवजना, दाती, कृष्णापुर, पिंपरी बु. या चार गावांसाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक बसविणे, नाली बांधकाम व विद्युतीकरणाची कामे केली जाणार आहेत. पिंपरी खुर्द येथे 12 लाख रुपयांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक व सिमेंट रस्ता आणि चिखली येथे 19 लाख रुपयांच्या निधीतून पेव्हर ब्लॉक व विद्युतीकरणाची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या कामांना लवकरच सुरुवात होणार असून यबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.