विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! जानेवारीपासून रोज एक तास खेळाचा

335

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ही खूशखबरच म्हणावी लागेल. अभ्यासाच्या बोझामुळे विद्यार्थ्यांचे स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष होत असते. देशाची नवी पिढी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत असायला हवी या उद्देशाने येत्या जानेवारीपासून प्रत्येक महाविद्यालयाला रोज एक तास खेळासाठी राखीव ठेवावा लागणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेच (यूजीसी) तसे निर्देश दिले आहेत.

रोजची किमान 45 ते 60 मिनिटे शारीरिक व्यायाम आणि खेळासाठी राखीव ठेवण्यात यावीत असे परिपत्रक यूजीसीने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पाठवले आहे. रोज एक तास फिटनेसचा ठेवता येईल असे प्रत्येक वर्गाचे शैक्षणिक वेळापत्रक बनवा असे त्यात नमूद करण्यात आले आहे. या तासामध्ये ऍथलेटिक्स, इनडोअर किंवा आऊटडोअर खेळ, योगा, सायकलिंग, स्वीमिंग किंवा अन्य प्रकारचे शारीरिक व्यायाम विद्यार्थ्यांकडून करवून घेतले जाणार आहेत.

फिटनेस क्लबही स्थापन करावा लागणार

प्रत्येक महाविद्यालयाने फिटनेस क्लब स्थापन करावा अशाही सूचना यूजीसीने दिल्या आहेत. त्या क्लबच्या माध्यमातून क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जावे आणि त्याचे मासिक नियोजन केले जावे.

कॉलेजांना रोज एक तास देणे कठीण

यूजीसीचा हा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याची अंमलबजावणी करता येईल का असा प्रश्न अनेक महाविद्यालयांना पडला आहे. शारीरिक आणि मानसिक फिटनेसला आम्ही महत्त्व देतो, पण आठवडय़ाला आम्हाला फक्त 25 तास मिळतात. त्यामुळे दर दिवशी एक तास खेळाला देणे कठीण आहे. आठवडय़ातून एक तास मात्र निश्चित देता येईल असे मुंबईतील काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सांगितले.

दुसर्‍या शिफ्टमध्ये तास देणे शक्य

अनेक महाविद्यालये ही दोन शिफ्टमध्ये चालतात. पहिली शिफ्ट सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत असते तर दुसरी शिफ्ट ही दुपारी 1.40 ते सायंकाळी 6.40 पर्यंत चालते. दुसर्‍या शिफ्टमध्ये खेळासाठी एक तास दिला जाऊ शकतो असे काही महाविद्यालयांचे म्हणणे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या