
कोरोनामुळे गतवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रवासासाठी अनेक निर्बंध असतानादेखील अनेक अडचणीतून मार्ग काढत मरीन कमांडो (निवृत्त) रवी कुलकर्णी यांनी एका वर्षात देशातील वेगवेगळ्या पर्वतरांगामध्ये सव्वाशेहून अधिक ट्रेक्स करत अनोखा विक्रम केला आहे. या ट्रेक्समध्ये हिमालयातील केदारकंठ, तुंगनाथ, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, खीरगंगा यांसारखे सुप्रसिद्ध ट्रेक्स, गोव्यातील दुधसागर धबधबा तसेच दक्षिण हिंदुस्थानातील नीलगिरी पर्वतरांगांमधील ट्रेक्सचा समावेश आहे.
रवी कुलकर्णी यांनी या वर्षी 125 पेक्षा जास्त ट्रेक्स पूर्ण केले आहेत. सह्याद्रीतील अनेक ट्रेक्स, कळसुबाईसारखे सर्वोच्च शिखर, गडकिल्ले यांचा यात समावेश आहे. यापैकी 30 हून अधिक ट्रेक्स त्यांनी ‘सोलो’ म्हणजे एकटय़ाने केलेले आहेत, खीरगंगा हा हिमालयातील चार दिवसांचा पूर्ण ट्रेक ही त्यांनी एकटय़ानेच केला. सोबत गाईड आणि मोबाईल नेटवर्कही नसल्याने बऱयाचदा भरकटायलासुद्धा लागले, तरीही हे ‘सोलो’ ट्रेक्स त्यांनी पूर्ण केले.
2022 मध्येही कुलकर्णी यांनी आपला ट्रेक्सचा प्लॅन आखला आहे. त्यामध्ये लडाखमधील झंस्कार नदीवरील उणे 30 ते 40 अंश सेल्सियस या तापमानामध्ये केला जाणारा चादर ट्रेक तसेच माऊंट एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकही आहे.

























































